कोल्हापूर / इम्रान गवंडी :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयाच्या (सीपीआर) आवारातील 13 अतिक्रमणावर सीपीआर प्रशासनानाने हातोडा मारला. सीपीआर आवारातील अनाधिकृत केबिन्स हटवल्यामुळे परिसर मोकळा झाला आहे. अतिक्रमण निघाले असले तरी अजूनही अस्ताव्यस्त पार्कींगमुळे सीपीआरचा श्वास कोंडत आहे. चार चाकी वाहन तरे रस्त्यावरच पार्कींग केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तर बऱ्याचदा रूग्णवाहिका अडकून पडत आहे.
न्यायालयाचा आदेश असतानाही बऱ्याच वर्षापासून अतिक्रमणावर कारवाई होत नव्हती. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी एका कार्यक्रमात अधिष्ठाता सत्यवान मोरे अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. कारवाई करता येत नसेल तर स्वेच्छा निवृत्ती घ्या, असा दमही भरला होता. यानंतर अतिक्रण कारवाईला वेग आला. काही राजकीय संस्था, संघटनांचा दबाव झुगाररून प्रत्यक्षात कारवाईही झाली. त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न निकाली लागला. याचप्रमाणेच पार्कींगच्या नियोजणासाठीही प्रशासनाने ठोस नियोजन करण्याची गरज आहे.

- जागा कमी व वाहनेच जास्त
सीपीआरमध्ये रोज 1 हजार ते 1500 रूग्ण तपासणीसाठी येतात. रोज दोनशे ते तीनशे रूग्णांना अॅडमिट होतात. त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची संख्याही अधिक असते. रूग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, निवासी डॉक्टर, कर्मचारी वर्ग, नर्सिंग स्टाफ, परिचारीका, विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची सुमारे 2 हजार वाहने पार्कींग केली जातात. त्युमळे वाहने कमी व जागा अपुरी अशी स्थिती झाली आहे.
- सर्वच इमारतीसमोर अस्ताव्यस्त वाहने
सीपीआरमध्ये प्रवेश करताच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयासमोर उजव्या व डाव्या बाजूच्या परिसरासह अपघात विभागापर्यंत दिसेल त्या जागी वाहने लावली जातात. पार्कींगला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीसांनी जागोजागी पट्टेही ओढले आहेत. तरीही नियम धाब्यावर बसवून वाहने लावली जातात. सर्वच इमारतींच्या विभागांसमोर अस्ताव्यस्त पार्कींगमुळे चालत जाणेही अवघड बनले आहे.
- सुरक्षा सुरक्षा रक्षकांना दम
काही चारचाकी वाहन धारक तर सुरक्षा रक्षकांना दम देतच वाहने वाट्टेल तशी रस्त्याच्याकडेला लावतात. प्रत्येक विभागाच्या गेटसमोरच वाहने दाटीवाटीने लावली जात असल्याने चारचाकी वाहनांसाठी मोकळ्या जागेत व्यवस्था करण्याची गरज आहे.
- दृष्टीक्षेपात सीपीआर
एकूण इमारती : 18
एकूण विभाग : 36
रोज येणारे रूग्ण : 1 हजार ते 1500
रोज अॅडमिट होणारे रूग्ण : 200 ते 300
एकूण सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर : 150
एकूण शिकाऊ व इंटरशिप डॉक्टर : 400
एमबीबीएस विद्यार्थी : 600
नर्सेस : 500
चतुर्थश्रेणी व कार्यालयीन कर्मचारी : 350
- पार्कींगचे नियोजनही लवकरच
सीपीआर आवारातील अतिक्रमाणावर कारवाई केली. पुढील काही दिवसात पार्कींगचाही प्रश्न सोडविण्यात येणार आहे. त्यासाठी उपायायोजना सुरू आहेत. अधिष्ठाता कार्यालयाच्या पिछाडीस मोकळ्या जागेत व मुख्य इमारतीच्या समोरील बागेत पार्कींग व्यसस्थेसाठी प्रस्ताव दिला आहे.
डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय








