सांगली प्रतिनिधी
शहरातील अनधिकृत फलक, बोर्ड, फ्लेक्स विरोधातील मोहीम महापालिकेने अधिक तीव्र केली आहे. मंगळवारी सिव्हील चौक ते शंभर फुटी रस्ता या मार्गावरील अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली. दिवसभरात 120 हून अधिक फलक, बोर्ड जप्त करण्यात आले. रस्त्यांकडील हातगाडे, फळविक्रेत्यांनाही हटविण्यात आले. दुपारी पावसामुळे मेहिमेत व्यत्यय आला. पण, सायंकाळी पुन्हा मोहिमेला गती देण्यात आली. त्यामुळे रस्ता अतिक्रमण मुक्त झाला.
अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड आणि फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. व्यावसायिक, राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटनांनी अनधिकृतपणे बोर्ड लावले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहेच. याशिवाय शहराचे सौंदर्यही बिघडले आहे. या पार्श्वभूमिवर मनपाने अतिक्रमण विरोधी मोहीम सुऊ केली आहे. सोमवारी राजश्री शाहू महाराज मार्गावरील शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मंगळवारी सिव्हील चौक ते शंभर फुटी मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
सिव्हील हॉस्पिटलमुळे या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मात्र काही लॅब, दवाखाने, पान शॉपसह फळ आणि हातगाडी चालकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने रस्ता अऊंद झाला होता. मंगळवारी या मार्गावरील सर्वच अतिक्रमणे हटविण्यात आली. अनेक मेडीकल, लॅबसह अन्य व्यावसायिकांचे बोर्ड जप्त करण्यात आले. फळ विक्रेते, हातगाडीचालकांना हटविण्यात आले. त्यामुळे संपूर्ण रस्ता मोकळा झाला. मंगळवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यात मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त झाल्याशिवाय मोहीम थांबणार नाही, अशी ग्वाही उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली आहे.
कारवाई थांबविल्यास आंदोलन
शंभर फुटी रस्त्यांवर महाराष्ट्र नव निर्माण सेनेने अनधिकृतपणे फलक लावला होता. अतिक्रमणच्या पथकाने तो जमिनदोस्त केला. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या. मंगळवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त साबळे यांची भेट घेत सरसकट अतिक्रमण काढण्याची मागणी केली. कारवाई थांबविल्यास महापालिकेचा बोर्ड काढू, अशी धमकी उपायुक्त साबळे यांना दिली. साबळे यांनीही धाडस दाखवत शहर अतिक्रमण मुक्त करण्याची ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांना दिली.