सातारा, प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील वर्धनगड येथे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या कबरी भोवतीचे बांधकाम हटवण्याचे काम मध्यरात्री पासून पोलीस बंदोबस्तात सुरू केले आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वर्धनगडावर कबरीच्या लगत अनाधिकृत बांधकाम वाढले असून ते हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सातारा जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन मागणी केली होती. त्या मागणीनुसार वन विभाग आणि सातारा पोलीस बंदोबस्तात हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.. जेसिबी आणि मनुष्यबळाचा वापर करून कबरी भोवती असलेले बांधकाम तोडण्यास सुरूवात केली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी येण्यास मज्जाव घालण्यात आला असून ही कारवाई नियमानुसार असून शांततेचे आवाहन करण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले.









