माधव गाडगीळ यांचे प्रतिपादन
वार्ताहर /उसगांव
विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याची दिशा ठरवताना आवडीचे क्षेत्र निवडावे तसेच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे प्रतिपादन गोवा शालान्त मंडळाचे माजी सचिव माधव गाडगीळ यांनी केले. धावशिरे, उसगांव येथील उसगांव शाळा समुह क्र. 1 च्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. धावशिरे हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर शाळा समुहाच्या सचिव पूर्वा उसगांवकर, हायस्कूलच्या पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष विजया गावडे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्dयाध्यापिका गौरव्वा हेब्बाळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीपप्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पूर्वा उसगांवकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. त्यानंतर समुहातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बर्वे यांनी तर संजीवनी आढाव यांनी आभार मानले.









