वृत्तसंस्था/श्रीनगर
अमरनाथ यात्रेपूर्वी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी मोठी चकमक झाली. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिह्यातील बसंतगड भागात सुरक्षा दलाकडून मोठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेवेळी परिसरात दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. सुरक्षा दलांनी परिसराला सर्व बाजूंनी वेढा घातला होता. दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. जंगलात सुरक्षा जवानांचा मागमूस लागताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सायंकाळी उशिरापर्यंत संघर्ष सुरू होता.
मात्र, या चकमकीत कितपत नुकसान झाले याबाबतची माहिती सुरक्षा दलांनी उशिरापर्यंत जाहीर केली नव्हती. सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस संयुक्त कारवाई करत आहेत. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. ड्रोनद्वारे हवाई देखरेख देखील केली जात आहे. उधमपूर जिह्यातील बसंतगड परिसरातील बिहाली भागात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सैन्याने जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई सुरू केली होती. यावर्षी अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होत असून लाखो भाविक त्यात येण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत उधमपूरमध्ये दहशतवाद्यांची उपस्थिती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय बनली आहे.









