वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी मार्गी, लोलाब, कुपवाडा येथील सामान्य भागात संयुक्त कारवाई सुरू केली आहे. यावेळी दहशतवाद्यांचा मागमूस लागताच दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. बुधवारी सायंकाळपर्यंत या भागात कारवाई व शोधमोहीम सुरू होती.
कुपवाडासोबतच बांदीपोरामध्येही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेल्याची माहिती लष्कराने बुधवारी दिली. सलग दुसऱ्या दिवशी परिसरात कारवाई सुरू होती. याआधी मंगळवारी बांदीपोरा येथील चकमकीनंतर भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीर पोलिसांसह संयुक्त कारवाई सुरू केली होती.









