प्रयागराजमध्ये अतिक अहमदच्या मुलाचा चालक ठार
@ वृत्तसंस्था / प्रयागराज
उत्तर प्रदेशातील उमेश पाल हत्येप्रकरणी प्रयागराज पोलिसांनी एका संशयित आरोपाचे एन्काउंटर केले आहे. अरबाज असे संबंधिताचे नाव आहे. सोमवारी दुपारी धुमनगंज येथील नेहरू पार्कजवळ सुरक्षा यंत्रणांची त्याच्याशी चकमक झाली. या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या अरबाजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच एका पोलीस अधिकाऱयाच्या हाताला गोळी लागली असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
उमेश पाल याच्या हत्येनंतर अरबाज हा संशयित नेहरू पार्क परिसरात लपून बसला होता. त्याच्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू असताना त्याने स्टेशन प्रभारी राजेशकुमार मौर्य यांच्यावर गोळीबार केला. राजेशकुमार यांच्या हाताला गोळी लागल्यानंतर पोलिसांनीही आपल्यावरील हल्ल्याला रोखठोक प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अरबाजच्या छातीत आणि पायाला गोळी लागली आहे. पोलिसांनी जखमी अरबाजला स्वरूपराणी नेहरू रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर जखमी स्टेशन प्रभारी राजेशकुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उमेश पाल याच्यावर हल्ला झाल्यानंतर तपासण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अरबाजचा चेहरा दिसून आला होता. पुरामुफ्ती येथील सल्लापूर येथे राहणारा अरबाज नावाचा एक सराईत गुन्हेगार गाडी चालवत असल्याची माहिती मिळाली. तसेच उमेशवर हल्ला करण्यातही त्याचा सहभाग स्पष्ट झाला होता. अरबाज हा अतिक अहमदचा मुलगा असद याचा चालक होता. हल्लेखोरांचे पेटा वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. अरबाज हा बाहुबली अतिक अहमद याचा निकटवर्तीय होता. त्याचे वडीलही अतिक अहमद याची गाडी चालवत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे.









