एका नक्षलवाद्याचा खात्मा केल्याचे स्पष्ट : दिवसभर शोधमोहीम
वृत्तसंस्था /जगदलपूर
छत्तीसगड-तेलंगणा राज्याच्या सीमेवर शुक्रवारी सकाळी तेलंगणा ग्रेहाऊंड फोर्सच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. बिजापूर जिह्यातील इल्मिडीच्या जंगलात घुसलेल्या ग्रेहाऊंड फोर्सने नक्षलवाद्यांच्या मोठ्या तुकडीला घेरल्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. या संघर्षात एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात आले असून अन्य सहकारी जंगलभागात फरार झाल्याचे समजते. या चकमकीनंतर दिवसभर या भागात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अन्य नक्षलवाद्यांचा ठावठिकाणा समजू शकला नाही.
छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर शुक्रवारी दिवसभर नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलांशी सामना सुरू होता. यावेळी झडलेल्या चकमकीनंतर एका नक्षलवाद्याचा मृतदेह शस्त्रांसह जप्त करण्यात आला. या चकमकीपूर्वी छत्तीसगडमधील बिजापूर जिह्यात गुऊवारी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात दोन सुरक्षा जवानांना प्राणास मुकावे लागले होते. तसेच अन्य चार जण जखमी झाले होते. याचा बदला घेण्यासाठी सुरक्षा दलाकडून व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनी बिजापूर जिह्यातील मंदामिरकाच्या जंगलात आयईडी स्फोट घडवून आणला होता.









