डिटोनेटर्ससह स्फोटक साहित्य जप्त
वृत्तसंस्था /विजापूर
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि शेजारील छत्तीसगडमधील पोलिसांनी नक्षलप्रवण भागात राबविलेल्या विशेष संयुक्त मोहिमेदरम्यान गोळीबार होण्याची घटना नुकतीच उघड झाली. यादरम्यान दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईनंतर घटनास्थळावरून स्फोटके, माओवादी साहित्य आणि इतर दस्तावेज जप्त करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले. गडचिरोली पोलिसांना 15 ऑगस्टच्या रात्री छत्तीसगडच्या विजापूर जिह्यातील भोपाळपट्टणमच्या उत्तरेस, दोन राज्यांच्या सीमेवर सँड्रा ‘एलओएस’ (स्थानिक संघटना पथक) नक्षलवाद्यांच्या तळाबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच छत्तीसगडमधील विजापूरच्या पोलीस अधीक्षकांना तत्काळ माहिती देण्यात आली. शोध मोहिमेसाठी अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त पथक तयार करण्यात आले. त्यात सुमारे 200 कमांडो आणि विजापूरचे डेप्युटी एसपी आणि 70 डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड कमांडो यांचा समावेश होता. बुधवारी रात्री उशिरा संयुक्त पथक परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षलींनी जंगलभागात पोबारा केला. गोळीबार संपल्यानंतर परिसरात झडती घेण्यात आली असता डिटोनेटर्स, जिलेटीन कांड्या, मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य, एक मोबाईल फोन, चार बॅकपॅक, ताडपत्री व इतर साहित्य जप्त करण्यात आले.









