ह्यूमन जीपीएस’ नावाने परिचित : घुसखोरांना मदत करण्यात सक्रिय
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) झालेल्या संघर्षात ‘ह्यूमन जीपीएस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहशतवादी बागू खानचे एन्काउंटर करण्यात आले. बागू खानला ‘समंदर चाचा’ म्हणूनही ओळखले जात असे. भारतीय हद्दीत घुसखोरांना पाठविण्यामध्ये बागू खानचा सक्रिय सहभाग होता. आता त्याच्या खात्म्याने सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. सुरक्षा यंत्रणांच्या यादीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून त्याचे नाव आघाडीवर होते.
गुरेझ सेक्टरमध्ये 28 ऑगस्ट रोजी झालेल्या घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांची बागू खानशी चकमक झाली. यामध्ये तो त्याच्या एका साथीदारासह मारला गेला. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. तथापि, दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या घुसखोरीबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. या आधारे, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बागू खान 1995 पासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहत होता. तो 25 वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. तो घुसखोरीच्या सर्वात जुन्या समर्थकांपैकी एक होता. घुसखोरीच्या 100 हून अधिक घटनांमध्ये तो सहभागी होता. बागू खानला जम्मू काश्मीरमधील घुसखोरीच्या सर्व मार्गांची माहिती होती. तसेच त्याला सुरक्षित मार्गांची माहिती असल्यामुळे त्याचे नाव ‘ह्यूमन जीपीएस’ असे ठेवण्यात आले होते.
पहलगाम हल्ल्यापासून 23 दहशतवाद्यांचा खात्मा
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत 7 वेगवेगळ्या चकमकींमध्ये 23 दहशतवादी मारले गेले आहेत. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. इतर 21 दहशतवाद्यांपैकी 12 पाकिस्तानी नागरिक होते तर 9 स्थानिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.









