गाझियाबादमध्ये पोलिसांशी चकमक
वृत्तसंस्था / गाझियाबाद
बरेली येथील अभिनेत्री दिशा पटानीच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गाझियाबादच्या थाना टेक्नो सिटी परिसरात मंगळवारी झालेल्या चकमकीत मुख्य आरोपी रवींद्र आणि अरुण यांचा मृत्यू झाला. ही संयुक्त कारवाई यूपी स्पेशल टास्क फोर्स, दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि हरियाणा स्पेशल टास्क फोर्स यांनी केली. मारल्या गेलेल्या आरोपींची ओळख पटली असून रवींद्र उर्फ कल्लू (राहणार – रोहतक) आणि अरुण (राहणार – गोहना रोड, सोनीपत) अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही गोळीबार करणारे कुख्यात गुंड गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा टोळीचे सक्रिय सदस्य होते. घटनास्थळावरून ग्लॉक आणि जिगाना पिस्तूल आणि अनेक काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
12 सप्टेंबर रोजी पहाटे 3:45 वाजता बरेली येथील दिशा पटानीच्या घरी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी सुमारे नऊ राउंड गोळीबार केला. गोळीबारानंतर टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारत हा हल्ला अभिनेत्रीची बहीण खुशबू पटानी हिने धर्मोपदेशक प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीचा बदला असल्याचे म्हटले होते.









