उत्तर प्रदेशातील घटना : 24 तासाच्या आत आरोपीवर कारवाई
वृत्तसंस्था/ लखनौ
तीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी चकमकीत ठार मारले आहे. 5 जून रोजी लखनौच्या आलमबाग पोलीस स्टेशन परिसरात तीन वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा एक प्रकार उघडकीस आला. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी दीपक वर्मा याचे पोलिसांनी एन्काउंटर केले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका मुलीचे अपहरण आणि बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी 24 तासांच्या आत कारवाई करत आरोपीला ठार मारले. तत्पूर्वी, बलात्काराची घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी दीपक वर्मा याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यासाठी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
पीडित मुलगी तिच्या पालकांसोबत चंदर नगर पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या आलमबाग मेट्रो स्टेशनखाली झोपली होती. तिथून आरोपींनी तिचे अपहरण केले होते. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी निष्पाप मुलीला झुडपात फेकून दिले. सकाळी मुलीची शोधाशोध सुरू केल्यानंतर ती झुडपात सापडली. यानंतर, त्यांनी गुरुवारी सकाळी 7:30 वाजता निष्पाप मुलीला लोकबंधू रुग्णालयात नेले. जिथे प्राथमिक उपचारानंतर मुलीला केजीएमयूच्या बालरोग शस्त्रक्रिया विभागात पाठवण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांची एक टीम मुलीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. यासोबतच रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच मुलीच्या आरोग्याबाबत अधिक तपशीलवार माहिती प्राप्त होणार आहे.









