वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिह्यातील छत्रू येथील कलाबन वन परिसरात बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक सैनिक जखमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीने संयुक्त कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान दहशतवादी आणि जवानांमध्ये गोळीबार सुरू होताच चकमक सुरू झाल्याचे ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या कारवाईला ‘ऑपरेशन छत्रू’ असे नाव देण्यात आले आहे. बुधवारी दिवसभर गोळीबार झालेल्या भागात शोधमोहीम सुरू होती. यादरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबारही केला जात होता. परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा संशय आहे.









