हिरानगर सेक्टरमध्ये 4-5 संशयित लपल्यानंतर शोधमोहीम : दोन्ही बाजूंनी गोळीबार
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे रविवारी संध्याकाळी उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. हिरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तान सीमेजवळ चार ते पाच संशयित दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सान्याल गावाजवळ शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक दहशतवाद्यांच्या जवळ पोहोचताच त्यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबारानंतर या भागात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत अधूनमधून गोळीबार सुरूच होता.
सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. स्थानिकांनी या भागात चार ते पाच दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय सैन्याला दिली होती. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सैनिकांनी गोळीबार करून चोख प्रत्युत्तर दिले.
सान्याल हे अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे. गेल्यावर्षी घुसखोरीच्या एका प्रकरणात येथील पोलीस चौकीजवळ ग्रेनेड फेकण्यात आला होता. हा परिसर भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेपासून थोड्या अंतरावर आहे.
आठवड्यापूर्वी कुपवाडामध्ये संघर्ष
17 मार्च रोजी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील खुरमोरा राजवार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एक दहशतवादी मारला गेला तर काही दहशतवादी वेढा तोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. या चकमकीत एक सैनिकही जखमी झाला. दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर क्रुम्हुरा गावात घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक झाली.









