सात तास थ्रीफेज वीजपुरवठा करण्याची भाजप-रयत मोर्चाची मागणी : बेळगाव-बागलकोट महामार्गावर रास्तारोकोमुळे वाहनांच्या रांगा
वार्ताहर /सांबरा
पंत बाळेकुंद्री येथील पंतनगर येथे भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ व रयत मोर्चाच्या वतीने सात तास थ्रीफेज वीजपुरवठा करण्याच्या मागणीसाठी हेस्कॉमच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला. त्यानंतर बेळगाव-बागलकोट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. सुमारे तासभर छेडलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांबवर रांगा लागल्या होत्या. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सात तास थ्री फेज वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सध्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके वाळून जात आहेत. अशातच अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी सोडणे कठीण जात आहे. त्यामुळे दिवसा सात तास विद्युतपुरवठा करण्यात यावा व शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या किसान सन्मान निधीचे अनुदान पुन्हा देण्यात यावे, या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना 4 हजारचा निधी द्यावा
सकाळी 11 वाजता आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी हेस्कॉमच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला व त्यानंतर बेळगाव-बागलकोट महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी बोलताना राज्यसभा सदस्य व भाजपा कर्नाटक राज्याचे रयत मोर्चा अध्यक्ष इराण्णा कडाडी म्हणाले की, केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये तसेच राज्यातील पूर्वीच्या भाजप सरकारकडून चार हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये शेतकऱ्याला किसान सन्मान निधी म्हणून देण्यात येत होते. मात्र काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर 4000 निधी देणे बंद करण्यात आले आहे. यासह शेतकऱ्यांना इतर योजनेतून मिळणारे अनुदानही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांवर अन्याय होत आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष, माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, शिवारातील थ्री फेज विद्युतपुरवठा रात्री अपरात्री केवळ एक ते दोन तास देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागरण करून पिकांना पाणी सोडावे लागत आहे. अशाने शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. पाऊस नाही त्यातच केवळ एक दोन तासात दिलेल्या वेळेत पिकांना पाणी देणे कठीण जात आहे. यासाठी दररोज सात तास थ्रीफेज वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, खडीमशीनना 24 तास वीजपुरवठा केला जातो. मात्र देशाचा कणा म्हणून समजल्या जाणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. तरी उद्यापासून सात तास विद्युतपुरवठा न केल्यास याहीपेक्षा उग्र आंदोलन छेडण्यात येईल. याची सरकारने नोंद घ्यावी, असा इशारा दिला. यावेळी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व उद्यापासून लगेच सात तास विद्युतपुरवठा करणार असल्याची ग्वाही दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामध्ये युवराज जाधव, शंकर मल्लन्नवर, मल्लिकार्जुन मादन्नावर, तिपाजी मोरे, भरमा गोमानाचे, शहाजी जाधवसह अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलगाड्या-ट्रॅक्टर घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी
आंदोलनामध्ये शेतकरीवर्ग बैलगाड्या व ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. आंदोलनात सरकारविरोधात घोषणा देण्यात येत होत्या. सुमारे तासभर छेडलेल्या आंदोलनामुळे बेळगाव-बागलकोट मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मारिहाळ पोलिसांनी आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.









