मंत्री सुदिन ढवळीकर यांचे उद्गार : मडकईत सागरी शेती शिबिर
वार्ताहर /मडकई
म़त्स्यशेती व्यवसायातून निर्माण होत असलेला रोजगार व व्यवसाय वाढीस लागण्यासाठी मत्स्योद्योग मंत्री असताना आपण बरेच प्रयत्न केले होते. सन् 2002 साली मत्स्य प्रजोत्पादनच्या बंदी काळात थोडा बदल केला. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर व माजी मंत्री स्व. माथानी साल्ढाणा यांच्या सहकार्यांने अनेक योजना सुऊ केल्या. त्यामुळेच मत्स्य संपदेचे संरक्षण झाले. ही शिबिरे त्याचेच फलीत असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
मडकई ग्रामपंचायत सभागृहात उन्नत भारत अभियानातर्फे स्कूल ऑफ बायोलॉजीकल सायन्स अॅण्ड बायोटॅक्नोलोजी गोवा विद्यापीठ यांच्या सयुंक्त विद्यमाने अखिल गोवा सागरी शेती या विषयावर एक दिवशीय शिबीराच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्री सुदिन ढवळीकर बोलत होत. यावेळी मडकई पंचायतीचे सरपंच शैलेंद्र पणजीकर, उपसरपंच संध्या नाईक, बॉयोलोजीकल सायन्सच्या डीन सविता केरकर, उन्नत भारत अभियानच्या प्राध्यापिका डॉ. ज्योती पवार, कार्य शिबिराच्या संयोजिका डॉ. लता गावडे, डॉ. हरित खानापुरी आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
विशाखापट्टणम, तामीळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यात खूप मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. विद्यापिठाच्या तज्ञांनी त्या राज्यात जावून तेथील ज्ञान गोव्यातील युवकांना द्यावे. तशा प्रकारची संधी गोव्यातही असून त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. जुवारी नदीच्या पात्राला जोडून असलेल्या खाडीत मत्स्य व्यवसाय तेजीत आणण्याची संधी आहे. मत्स्यशेती निर्माण करुन मत्स्य व्यवसायातून मासळी निर्यात करण्याचे प्रयत्न करावेत, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पुढे बोलताना सांगितले.
शैलेंद्र पणजीकर यांनी विविध जातीच्या मासळीचा परिचय करुन देताना सांगितले की, खारवी समाजातील असल्याचा अभिमान आहे. त्या स्वाभिमानापोटीच आपण समुद्रात जावून अजूनही तिसऱ्या काढत असतो. युवकांनी रोजगार निर्मितीसाठी मत्स्यशेतीचा व्यवसाय करावा. प्रा. सवीता केरकर व ज्योती पवार यांनी, मडकई पंचायत सभागृहात आयोजीत केलेले हे दुसरे शिबीर असल्याचे सांगितले. माशांच्या विविध प्रजाती व त्यांची ओळख दोन्ही शिबिरात करुन दिलेली आहे. स्वागत व प्रास्ताविक डॉ. लता गावडे यांनी केले. डॉ. हरित खानापुरी यांनी आभार मानले.









