प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला प्रचंड वाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राद्वारे रोजगाराचे अनेक दरवाचे खुले झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मडगाव रवींद भवनात बोलताना दिली. गोवा विकास शिखर परिषदेच्या समारोप सोहळय़ात मुख्यमंत्री बोलत होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जीसीसीआयचे अध्यक्ष राल्फ डिसोझा, नितीन कुंकळय़ेकर, आयटी कमिटीचे चेअरमन मिलिंद प्रभू व संजय आमोणकर उपस्थित होते. गोव्यात प्रथमच गोवा विकास शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, 26 एप्रिल रोजी गोव्यात स्वंयपूर्ण गोव्याला सुरवात केली. आज गोव्याच्या ग्रामीण भागात अनेकजण स्वताचा रोजगार सुरू करून गोव्याला स्वंयपूर्ण करण्यासाठी हातभार लावत आहे. स्वंयपूर्ण मित्र तसेच स्थानिक पंचायती देखील त्यासाठी पुढाकार घेत आहे.
गोव्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होत आहे. सोफ्टवेअर विकसीत करणाऱयांनी भरारी घेतली आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना उलपब्ध संधीची माहिती देण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आयटी क्षेत्राशी संबंधित डायरी तयार करण्यात आली असून त्यात गोव्यात कार्यरत असलेल्या कंपन्यांची माहिती उलपब्ध करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
2030 पर्यंत गोव्यात आयटी क्षेत्र प्रचंड भरारी घेईल, त्यासाठी या क्षेत्राला गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आयटी क्षेत्राचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांना आगामी काळात अनेक संधी चालून येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण मुख्यमंत्री कार्यालयाशी करण बजाज यांना सल्लागार म्हणून सामावून घेतले आहे. त्यांनी आयटी क्षेत्रासाठी भरीव कार्य केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्याला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर करण्याची जबाबदारी ही युवा पिढीची आहे. मिलिंद प्रभू यांनी पुढाकार घेऊन या परिषदेचे आयोजन केले होते. गोव्यातील युवा पिढीने त्यातून उलपब्ध संधी माहिती मिळण्यास मदत झाली. आज प्रत्येक क्षेत्रात आयटीची गरज आहे व त्यातून रोजगार निर्मिती होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.









