दिव्यांगजन आयोगासमवेत सहकार्य करार
पणजी : राज्यामध्ये दिव्यांगजनांसाठी रोजगार संधींच्या निर्मितीसाठी आणि दिव्यांगजनांना गोवा तसेच इतर राज्यांतील उद्योग क्षेत्रांमधील कौशल्य प्रदान करण्याच्या उद्देशाने विविध अभ्यासक्रम राबवण्यासाठी गोवा राज्य दिव्यांगजन आयोग आणि बेंगळुरू येथील एनेबल इंडिया या एनजीओ यांच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विविध उद्योगांमध्ये दिव्यांगजनांसाठी विविध पदांवर रोजगार संधी मिळण्यासाठी आवश्यक कौशल्ये, प्रशिक्षण प्रदान करण्याचे उद्दिष्ट या सहकार्य करारामागे निश्चित करण्यात आले आहे.
पणजी येथे घेण्यात आलेल्या बैठकीत राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरूप्रसाद पावसकर आणि एनेबल इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपेश सुतारिया यांनी या सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे समाजकल्याण, नदी परिवहन, पुरातत्व विभाग या खात्यांचे मंत्री सुभाष फळदेसाई, समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, दिव्यांगजन आयुक्तालय कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक, एनेबल इंडियाच्या संस्थापिका प्रमुख शांती राघवन यांच्यासह दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘आज या सामंजस्य करारावर स्वाक्षरी होत आहे याचा मला खरोखर आनंद होत आहे. कुशल मनुष्यबळ घडवणे आणि दिव्यांगजनांसाठी रोजगार संधी निर्माण करण्याचा आपला दृष्टीकोन पुढे नेण्यासाठी योग्य दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. यासाठी गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुऊप्रसाद पावसकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि गोव्यामध्ये दिव्यांगजनांच्या हितासाठी काम करण्राया प्रत्येकाने राबवलेला प्रयत्न प्रशंसनीय आहेत असून हे सर्वजण कौतुकास पात्र आहेत. या सहकार्य काराच्या माध्यमातून दिव्यांगजनांसाठी अधिक समावेशक आणि सुलभ समाज निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. या उपक्रमाचा हेतू केवळ त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यापुरता मर्यादित नाही, तर सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यकुशलतेला प्रोत्साहन देणे आहे,” अशी प्रतिक्रिया गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केली.
दिव्यांगजनांमध्ये अफाट क्षमता आहेत. राज्य आणि राष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक विकासात दिव्यांगजनांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. दिव्यांगजन आणि रोजगार यातील दरी कमी करत, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्याबरोबरच अधिक समावेशक आणि कार्यकुशल मनुष्यबळ विकासाला चालना देत आहोत. आम्हाला आशा आहे की ही भागीदारी अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करेल, अशी भावना राज्य दिव्यांगजन आयुक्त गुऊप्रसाद आर. पावसकर यांनी व्यक्त केली. एनेबल इंडिया ही बिगरशासकीय संस्था 1999पासून ना-नफा तत्वावर कार्यरत आहे. दिव्यांगजनांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे आणि सन्मानाने समाजात त्यांना वावरण्याचे बळ मिळावे यासाठी ही संस्था काम करते. दिव्यांगजनांमधील रोजगार क्षमता वाढवणे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या कामी देशातील अग्रणी संस्था म्हणून एनबेल इंडियाकडे पाहिले जाते. दृष्टिदोष, श्रवणदोष, शारिरीक दिव्यंगत्व, मानसिक आजार अशा विविध प्रकारच्या समस्यां, गरजांसाठी ही संस्था काम करते. एनेबल इंडिया ही देशभरातील 700हून अधिक कंपन्या, व्यावसायिक संस्थांसमवेत भागीदारी उपक्रम राबवत असून आजवर 20,000हून अधिक दिव्यांगजनांना विविध रोजगारक्षम कौशल्यगुण अवगत करण्यासाठी प्रशिक्षण देत रोजगार उपलब्ध केला आहे.
“काम हा मानवी प्रतिष्ठेचा गाभा आहे आणि आम्ही एनेबल इंडियामध्ये 1999पासून दिव्यांगजनांना सन्मानीय आयुष्य मिळवून देण्यासाठी काम करत आहोत. पर्पल फेस्ट उपक्रमाच्या यशाच्या माध्यमातून गोवा सरकारसोबतच्या आमच्या सहकार्यसंबंधांना प्रेम आणि कृतज्ञतेची झालर लागली आहे. हा सामंजस्य करार दिव्यांग व्यक्तींना सन्मानजनक आयुष्य आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास सक्षम करण्यासाठी उपयुक्त मार्ग ठरणार आहे.”
– दीपेश सुतारिया, एनेबल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक









