केवळ 10 हजार कामगारांना काम : बहुतांशी कामगार प्रतीक्षेत
बेळगाव : असंघटित कामगारांना रोजगार देणाऱ्यांना उद्योग खात्री योजनेंतर्गत बेळगाव तालुक्यात सद्यस्थितीत 10795 कामगारांना रोजगार देण्यात आला आहे. एकूण तालुक्यात 90 हजार जॉब कार्ड आहेत. तर 45 हजारहून अधिक सुरळीतपणे काम करणाऱ्या कामगारांची संख्या आहे. मात्र सध्या केवळ 10 हजार कामगारांनाच काम देण्यात आले आहे. उर्वरित कामगारांना रोहयो कामाची प्रतीक्षाच लागली आहे.उद्योगखात्री योजनेंतर्गत एका कुटुंबाला 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे.मात्र अद्याप बहुतांशी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात उद्योग खात्री योजनेंतर्गत कामे सुरू झालेली दिसत नाहीत. त्यामुळे कामगारांना हक्कांच्या रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. सुगी आणि इतर कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातून रोहयो कामाची मागणी होऊ लागली आहे. मात्र ग्राम पंचायतींमधून कामे उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांना रोहयो कामापासून दूर रहावे लागले आहे. शिवाय दैनंदिन उदरनिर्वाहासाठी इतरत्र काम करावे लागत आहे.
रोहयो कामे उपलब्ध करून द्या
शासनाकडून देण्यात आलेले रोहयोचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायत पातळीवर धडपड दिसत नाही. तालुक्यातील बहुतांशी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये रोहयो कामे सुरू नसल्याची बाब समोर आली आहे. विशेषत: मार्च ते मे दरम्यान रोहयो कामे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे. मात्र सद्यस्थितीत केवळ 10 हजार कामगारांनाच कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. इतरांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.
अनेक कामे प्रलंबित
केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग योजना सुरू केली आहे. मात्र ती ग्राम पंचायत पातळीवर अधिक प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. देशात या योजनेचा गवगवा होत असला तरी ग्रामीण भागात मात्र संथगतीने कामे सुरू आहेत. उद्योग खात्री योजनेंतर्गत तलाव, रस्ते, गटारी, नाले आणि इतर कामांचा विकास साधला जातो. मात्र सद्यस्थितीत अनेक कामे प्रलंबित असल्याचे दिसत आहे. बेळगाव तालुक्यात रोहयोचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिक प्रमाणात कामे उपलब्ध करून रोहयोंच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड
तालुक्यात सद्यस्थितीत 10 हजारहून अधिक रोहयोना कामे उपलब्ध करण्यात आली आहेत. सुगी आणि इतर कामांमुळे मागणी कमी होती. मात्र आता मागणीनुसार ग्राम पंचायत स्तरावर रोहयोंना कामे उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.
बी. डी. कडेमनी, (ता. पं. साहाय्यक निर्देशक )









