उष्म्यामुळे 30 टक्के सूट : मजुरांना दिलासा
बेळगाव : अकुशल कामगारांना आधार ठरलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील मजुरांना त्यांच्या कामात 30 टक्के सवलत देण्यात आली आहे. वाढत्या उष्म्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात ही सूट देण्यात आली आहे. मजुरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी केले आहे. या आदेशामुळे रखरखत्या उन्हात काम करणाऱ्या जिल्ह्यातील लाखो रोजगार मजुरांना दिलासा मिळाला आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे रोजगार हमी कामावर जाणाऱ्या मजुरांना त्रास होऊ लागला आहे. याची दखल घेऊन त्यांच्या कामात 30 टक्के सवलत देण्यात आली आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या उन्हाच्या दिवसात कामाचा ताण कमी करण्यात आला आहे.
त्याबरोबर 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही कामात 50 टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे वयोवृद्धांनाही दिलासा मिळाला आहे. त्याबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रथमोपचार पेटी, पाण्याची बॉटल आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रोहयो मजुरांनी त्यानुसार काम करावे आणि आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रोहयो अंतर्गत गटारी, तलाव, रस्ते, नाले आदींचा विकास साधला जात आहे. या योजनेत दिव्यांगांनाही सामावून घेतले आहे. त्यांच्यासाठी नवीन जॉब कार्डचेही वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे रोहयोच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या उन्हापासून बचाव करण्यासाठी कामात काहीशी सवलत देण्यात आली आहे. रोहयो मजुरांनी शक्य तितक्या लवकर कामावर जावे. नेमून दिलेली कामे वेळेत करूनच घरी जावे. मजुरांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे कळविले आहे.









