पंतप्रधानांच्या उपस्थितीत 16 वा रोजगार मेळा : आतापर्यंत 9.73 लाख उमेदवारांना लाभ
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींनी शनिवारी 16 व्या रोजगार मेळाव्यात 51 हजारांहून अधिक तरुणांना रोजगार पत्रे वाटली. तरुणांची ताकद ही देशाची भविष्यातील सर्वात मोठी शक्ती आणि हमी आहे. आमचे सरकार या भांडवलाला समृद्धीचे सूत्र बनवण्यात गुंतले असल्याचे पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले. देशभरात 47 ठिकाणी शनिवारी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यापूर्वीचा रोजगार मेळा 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधानांनी 22 ऑक्टोबर 2022 रोजी अशा रोजगार मेळाव्यांना प्रारंभ केला असून आतापर्यंत 9.73 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.
मी दोन दिवसांपूर्वीच पाच देशांच्या दौऱ्यावरून परतलो आहे. भारताच्या युवाशक्तीचा प्रतिध्वनी प्रत्येक देशात ऐकू आला. या काळात अनेक करार झाले असून तरुणांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्हाला वेगवेगळ्या विभागात काम करण्याची संधी मिळाली असली तरी सर्वांचे ध्येय एकच आहे. ‘काम कोणतेही असो, पद कोणतेही असो, क्षेत्र कोणतेही असो, एकमेव ध्येय म्हणजे राष्ट्रीय सेवा. एकमेव धागा म्हणजे नागरी सेवा. तुमच्या या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा.’ असे पंतप्रधानांनी नवनियुक्तांना संबोधित केले.
देशातील तरुणांची वाटचाल गतिमान
आज आपला देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. आपल्या देशातील तरुणांची ही प्रगती गतिमान पद्धतीने सुरू आहे. माझ्या देशातील तरुण वेगाने पुढे जात आहेत याचा मला आनंद आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
संधी वाढल्या, निर्यातही वाढली
उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी मिशन मॅन्युफॅक्चरिंगची घोषणा करण्यात आली आहे. केवळ पीएलआयमधून 11 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा विस्तार झाला आहे. 11 लाख कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन केले जात आहे. पूर्वी मोबाईल फोन उत्पादनाचे फक्त दोन-चार युनिट होते. सध्या 300 युनिट्स देशात कार्यरत असून त्यात लाखो तरुण काम करत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. भारत संरक्षण उत्पादनातही नवीन विक्रम करत आहे. संरक्षण उत्पादन 1.25 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे. भारत सर्वाधिक इंजिन बनवणारा देश बनला आहे. भारतात तयार झालेली उत्पादने अनेक देशांमध्ये निर्यात होत असल्याचेही पंतप्रधानांनी गौरवाने सांगितले.
गोरगरिबांना योजनांचा लाभ
देशात रोजगार निर्मितीसाठी सुरू असलेल्या अनेक योजनांमुळे 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. जागतिक बँकेसारख्या संस्था भारताला एक मॉडेल म्हणून सादर करतात. भारताला कमी असमानता असलेल्या देशांमध्ये स्थान दिले जात आहे. भारतातील 90 कोटी लोकांना कल्याणकारी योजनेअंतर्गत आणण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 4 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. या माध्यमातून गवंडी, कामगार, वाहतूक, ट्रक ऑपरेटर अशा कित्येक लोकांना रोजगार उपलब्ध झाला. ग्रामीण भागातही रोजगार वाढल्याची बाबही आनंददायी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.









