सुधाकर काशीद कोल्हापूर
कोल्हापूर पंचगंगा स्मशान भुमीतील कर्मचारी सुनिल कांबळे, राजेंद्र कांबळे आज २३ वर्षाच्या सेवेतून निवृत झाले. सुरवातीला आज इतकी प्रेतं जाळली, तितकी जाळली याची नोंद स्वतःजवळ ते ठेवायचे. नंतर नंतर हे काम नित्याचेच झाले. कोरोना काळात तर रोज ४० ते ७० अंत्यविधी करायची वेळ आली. एरव्ही स्मशानात अंत्यविधी, रक्षाविसर्जनाच्या निमिताने गर्दी असते. कोरोना काळात स्मशानात शुकशुकाट पण अखंड जळणाऱ्या चिता त्यांनी अनुभवल्या. स्मशानात काम करतो हे उघडपणे सांगणे त्यांनी तसे टाळले. कारण स्मशानात काम करणारा माणूस म्हटल की लगेच समोरच्याची नजरच बदलायची. एखाद्याने हातात हात दिला असला तर तो पटकन आपला हात काढून घ्यायचा. भूत नाही हे खरे आहे. पण तुम्हाला कधी स्मशानात भूत दिसले का ? असे विचारणारे अनेकजण भेटत राहिले. स्मशानात हुंदके, हंबरडा याची साथ त्यांच्या सोबत राहिली. रक्षाविसर्जनादिवशी पंचपक्वानाच्या नैवैद्याचा ढिग त्यांनी पाहिला. एवढा नैवैद्य ठेवुनही कावळा त्याला लौकर चोच लावत नाही म्हटल्यावर नातेवाईकांची होणारी घालमेल त्यांनी अनुभवली. अंत्यविधीला येणारे काहीजण स्मशानभुमीला ही गप्पाचा अड्डा कसा बनवतात हे त्यांनी रोज पाहिले. स्मशानात प्रेतासमोर आहे तोवर स्तब्ध. पण अंत्यविधी आटोपून परत जाताना पहिलेच वळण घेतल्यावर पुन्हा आपल्याच मुळ तोर्यात अनेकजण कसे येतात हे देखील त्यांनी पाहिले. अमावस्या पोर्णिमेला रात्री बाहेरुन स्मशानात लिंबू फेकणार्या विचीत्र व्यक्तींचा त्रास त्यांनी सहन केला. रात्रपाळीला असताना स्मशान शांतता म्हणजे काय हे क्षणाक्षणाला अनुभवले…. अशी सेवा देत आज ३१ जुलै निवृतीचा दिवस उजाडला. दिवसभर डयुटी करून सायंकाळी एका पेटत्या चितेला सुनिल कांबळे यांनी नमस्कार केला. आणि स्मशानातील नोकरी चा अखेरचा निरोप घेतला. बाहेर “मसणातली चिंच” म्हणून ओळखले जाणारे चिंचेचे झाड नदीकडून येणाऱ्या वार्याच्या झोतात सळसळत होते. पाऊस भुरभुरत होता . चितेच्या वर आळोखे पिळोखे देत जाणाऱ्या धुरात भुरभुरणारा पाऊस काही वेगळाच जाणवत होता..









