कंत्राटी सफाई कर्मचाऱयांचे 1 जुलैपासून कामबंद आंदोलन : शहापूर येथे झाली बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
सफाई कर्मचाऱयांकडे सरकारचे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सफाईचे काम करत असताना आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आम्हाला कायमस्वरुपी सामावून घ्यावे यासाठी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र आजपर्यंत त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे 1 जुलैपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातील सफाई कर्मचाऱयांनी घेतला असून या आंदोलनामध्ये दक्षिण भागातील कर्मचारीही भाग घेणार आहेत.
आनंदवाडी-शहापूर येथील रमाबाई आंबेडकर भवनमध्ये मंगळवारी बैठक झाली. याबैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला होते. बेळगावसह राज्यातील 30 हून अधिक जिल्हय़ातील कर्मचारी हे काम करत आहेत. मात्र अद्याप नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेण्यात आले नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्याच सोयी-सुविधा नाहीत. याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सफाई कर्मचारी विविध समस्यांना तोंड देत आहेत. वेतन बऱयाचवेळा दोन-तीन महिने दिले जात नाही. त्यामुळे कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. तेव्हा कंत्राटपद्धत रद्द करावी, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.
केवळ आश्वासनेच
पहाटे उठून हे कर्मचारी शहराची स्वच्छता करत आहेत. हे महत्त्वाचे काम असताना या कर्मचाऱयांना मात्र कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. हे दुर्दैव आहे. वास्तविक, या कर्मचाऱयांकडे सरकार, जिल्हा प्रशासन आणि समाजानेदेखील सहानुभूतीने पाहिले पाहिजे. मात्र केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. त्यामुळे आता आम्ही काम बंद आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला सफाई कर्मचारी समितीचे विजय निरगट्टी, शन्मुख आदीआंद्र, मालती सक्सेना, बळ्ळारी, मुनीस्वामी भंडारी आदी उपस्थित होते.









