कर्मचाऱयांनी कंपनी सोडणे व त्यासाठी राजीनामे देणे ही व्यवसाय-व्यवस्थापनातील एक निरंतर चालणारी प्रक्रिया समजली जाते. वेळ, व्यक्ती व व्यवसायानुरुप कर्मचाऱयांच्या कंपनी सोडण्याच्या कारण-प्रक्रियेत थोडा-फार बदल असू शकतो. पण कर्मचाऱयांच्या राजीनाम्याचे प्रकार आणि प्रमाण कायमस्वरुपी राहते हे एक वास्तव आहे.
यासंदर्भातील मूलभूत व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्मचारी कंपनी का सोडतात? कर्मचाऱयांच्या राजीनाम्यांच्या व त्याद्वारे नोकरी-कंपनी सोडण्याची कारणमीमांसा अनेकांनी व अनेक प्रकारे केलेली दिसून येते. पाश्चिमात्य व्यवस्थापन क्षेत्रात तर ‘ग्रेट रेसिग्नेशन्स’ या विशेष अभ्यास-उपक्रमाद्वारे या संदर्भात विशेष अभ्यास करण्यात आला आहे.
‘ग्रेट रेसिग्नेशन्स’च्या कर्मचाऱयांच्या राजीनाम्यांच्या संदर्भात नव्याने केलेल्या अभ्यासात प्रामुख्याने आढळून आलेली बाब म्हणजे कोविड-19 च्या कारणाने, त्या दरम्यान व आता त्यानंतर कर्मचाऱयांमध्ये कोरोनानंतरचे कामकामज, कामाचे स्वरुप व कामाशी निगडित सर्वच मुद्दय़ांवर नव्याने व नव्या संदर्भात विचार करण्याची प्रवृत्ती मोठय़ा प्रमाणावर दिसून आली आहे. भारतीय कंपनी आणि कर्मचारीसुद्धा या व्यावसायिक वस्तुस्थितीला अपवाद नाहीत.
देश-विदेशातील कर्मचाऱयांमध्ये सद्यस्थितीत कंपनी आणि कामाच्या जोडीलाच रोजगार आणि कौटुंबिक जीवन व जबाबदारीच्या संदर्भात विशेष चोखंदळ ठरले आहेत. याच कारणाने कंपन्यांमधील कर्मचारी रोजगार-नोकरीच्याबरोबरच कुटुंबासाठी वेळ देणे, घरच्यांची काळजी घेणे, त्यांच्यासह खेळणे-बाहेर जाणे, विशेष म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे या साऱयाला सारखेच महत्त्व देत असतात. कोरोनामुळे कर्मचारी आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबांना जीवन आणि जगणे, त्यांचे महत्त्व व परस्परांच्या संदर्भात नवी जाणीव झालेली दिसून येते. नव्याने येणाऱया कर्मचाऱयांच्या राजीनाम्यांचे प्रमाण, कारणे व टक्केवारी यांच्यामागे ही पार्श्वभूमी म्हणूनच विचारणीय ठरते.
यासंदर्भातील अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ‘लाइमेड’च्या अभ्यासानुसार सद्यस्थितीत कर्मचाऱयांनी राजीनामा देऊन नोकरी व कंपनी सोडण्यामागे असणारी मुख्य कारणे म्हणजे विविध कारणांनी त्यांच्यावर असणारा तणाव, कामकाज व वातावरणातील लवचिकतेची कमतरता वा अभाव, त्यांच्या गरजा व अपेक्षेनुरुप न मिळणारे फायदे व त्यांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष. याशिवाय सध्या नोकरी सोडून आपले काम आणि स्वानुभवावर आधारित छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्याकडेदेखील काहींचा भर असल्याने त्या कारणाने काही जण नोकरी सोडण्यास पसंती देतात.
भारताच्या संदर्भात कर्मचारी सोडून जाण्याचे सर्वाधिक प्रमाण माहिती-तंत्रज्ञान व संगणक सेवा क्षेत्रात दिसून येते. ही पूर्वापार परंपरा अद्यापही सुरूच आहे. भारतातील काही कर्मचारी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या जोडीलाच ‘स्टार्टअप’ सुरू करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. यामागे आर्थिक स्थैर्य व कामाची सुलभता या बाबी प्राधान्याने दिसतात. सद्यस्थितीत नोकरी सोडून जाणाऱयांचा कल हा आरोग्य सेवा, पर्यटन, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांकडे अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्मचाऱयांनी मोठय़ा प्रमाणात कंपनी सोडून जाण्यामागे कोरोनाकाळची पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट झाले असून हा मुद्दा नव्या संदर्भात व्यवस्थापन व व्यवस्थापकांनी पडताळून पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. यासंदर्भातील महत्त्वाची वस्तुस्थिती म्हणजे मध्यंतरी दीर्घकाळ म्हणजेच सुमारे दोन वर्षे कर्मचाऱयांना घरून काम करण्यावर व्यवस्थापनाचा जोर होता. काळाची गरज लक्षात घेता कर्मचाऱयांनी या नव्या व आवश्यक कार्यपद्धतीला विशेष आव्हानपर परिस्थितीत कर्मचाऱयांनी विविध अडचणींवर मात करत विशेष प्रतिसाद दिला. त्यानंतर मात्र आता कोरोनानंतर पूर्वीप्रमाणे कार्यालयीन कामाच्या ठिकाणी आधीसारखे काम करणे अनेकांना गैरसोईचे व नकोसे झाले आहे. याची परिणती मोठय़ा संख्येत कर्मचाऱयांच्या नोकरी सोडून जाण्यात झाली आहे.
या साऱया मुद्दे आणि पार्श्वभूमीवर व्यवस्थापनांतर्गत एचआर म्हणजेच मानव संसाधन विभागांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. तोडगे शोधावे लागले त्यावरसुद्धा ‘लाइमेड’च्या अभ्यासाद्वारा नवा प्रकाशझोत टाकण्यात आला. तो खालीलप्रमाणे-
@कोरोनानंतरच्या नवी पार्श्वभूमी आणि कार्यसंस्कृतीच्या पार्श्वभूमीवर ‘लाइमेड’ सर्वेक्षणानुसार 40 टक्के कर्मचाऱयांनी दूरस्थ पद्धतीने काम करण्याला त्यांची पसंती दिली आहे.
@सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 37 टक्के कर्मचाऱयांना पूर्वीपेक्षा अधिक पगार-सुविधा हव्याशा वाटतात.
@26 टक्के कर्मचाऱयांना आता म्हणजेच कोरोनानंतरच्या काळात कामकाज आणि कौटुंबिक जीवन यामध्ये अधिक चांगला ताळमेळ हवासा वाटतो.
@सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 24 टक्के कर्मचाऱयांना लवचिक व सोयीस्कर वेळांचे वाढते आकर्षण वाटते.
कंपनी आणि कर्मचारी या उभयतांशी कोरोनानंतर केलेल्या संवाद-सर्वेक्षणानंतर ‘दि ग्रेट रेसिग्नेशन्स’नी खालीलप्रमाणे उपाययोजना सुचविली आहे.
@प्रभावी कर्मचारी संवाद- नव्या उद्योग-व्यावसायिक पार्श्वभूमीवर कर्मचाऱयांचे प्रश्न आणि प्रयत्न यांच्याशी निगडित मुद्दय़ांचा विचार करून त्यानुसार व्यवस्थापनाची कार्यवाही असायला हवी.
@कंपनीअंतर्गत कर्मचाऱयांमध्ये सहकार्यावर आधारित वातावरण- कामाच्या ठिकाणी सहकारी आणि सहकार्यावर आधारित प्रभावी कार्यसंस्कृती राबविल्यास त्यामुळे कंपनी-कर्मचारी यांच्यामध्ये अधिक समन्वयाचे वातावरण निर्माण होईल.
@लवचिक-पूरक व प्रेरक कामकाज पद्धती- कोरोना काळामध्ये बहुधा सर्वांनीच व्यावसायिक गरजांनुरुप काम केले आहे. या आणि अशा अस्थिर व आव्हानपर स्थितीत व्यवसायासाठी आवश्यक पद्धतीने काम करण्याची सवय कर्मचाऱयांना झाली आहे. त्यांच्या याच प्रयत्नांना साद आणि दाद दिल्यास त्यांचा प्रतिसाद कायमस्वरुपी लाभू शकतो.
@कामकाज आणि कुटुंबामधील ताळमेळ- गेली सुमारे दोन वर्षे कंपनी-कर्मचारी या उभयतांनी परस्परांना सांभाळून काम केले आहे. काम आणि कुटुंब यामध्ये ताळमेळ साधतानाच उभय ठिकाणी कामकाज आणि कर्तव्य यामध्ये समन्वय साधण्याला अधिक चालना दिल्यास व्यवस्थापन-व्यवस्थापक व कंपनी-कर्मचारी यामध्ये अधिक प्रभावी व परिणामकारक संबंध अवश्य निर्माण होतील.
वरील अभ्यासपूर्ण व अभ्यासावर आधारित मुद्दय़ांवर विचार करून त्यानुसार कारवाई केल्यास कठीण व आव्हानपर परिस्थितीवर मात करता येते. अशा काम करण्यातून व्यवस्थापन व सर्वच स्तरांवरील कर्मचारी या उभयतांमध्ये सहकार्यच नव्हे तर समन्वय-सद्भाव निर्माण होतो. यातूनच उत्तम कामकाज संबंध व कार्यसंस्कृती निर्माण होईल. कर्मचाऱयांचे राजीनामा देण्याचे प्रमाण कमी होईल व उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नव्या वाटचालीला सुरुवात होईल.
– दत्तात्रय आंबुलकर, पुणे









