जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दिले निवेदन
बेळगाव : सरकारी महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून सेवा बजाविणाऱ्या अतिथी प्राध्यापकांना सेवेमध्ये कायम करण्यात यावे, अशी मागणी करत अतिथी प्राध्यापकांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. राज्यामध्ये 11 हजारांपेक्षा अधिक अतिथी प्राध्यापक विविध सरकारी महाविद्यालयांमध्ये सेवा बजावत आहेत. अनेक वर्षांपासून सेवा बजाविणाऱ्या या प्राध्यापकांना सेवेमध्ये कायम करून घेण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. अत्यल्प गौरवधनावर सेवा बजाविणारे अतिथी प्राध्यापक सरकार सेवेत कायम करून घेईल, या आशेवर सेवा बजावत आहेत. अनेकांची वयोमर्यादा उलटून गेली आहे. त्यामुळे या प्राध्यापकांना इतर ठिकाणी सेवा मिळणे कठीण आहे. यासाठी राज्य सरकारने याची दखल घेऊन यापूर्वीच्या सेवेची गणना करत सेवेमध्ये कायम करून घेण्यात यावे, अशी मागणी प्राध्यापकांकडून करण्यात आली आहे.
टप्प्याटप्प्याने सेवेत कायम करून घ्या
राज्य सरकारने विविध खात्यांमध्ये सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने सेवेत कायम करून घेतले आहे. त्या प्रमाणेच अतिथी प्राध्यापकांनाही सेवेत कायम करून घेण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. कृषी खाते, नगरविकास खाते, ग्राम विकास खाते या खात्यामध्ये सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्या प्रमाणे सेवेत कायम करून घेण्यात आले आहे. त्यानुसार अतिथी प्राध्यापकांनाही सेवेमध्ये कायम करून घेण्यात यावे, अशी मागणी अतिथी प्राध्यापक संघटनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.









