वाहनधारकांना करावी लागतेय कसरत : तातडीने दुरुस्तीची मागणी
वार्ताहर /धामणे
जुने बेळगाव ते धामणे या साडेचार किलो मीटर अंतर असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना त्रासदायक आणि धोक्याचे झाले आहे. हा रस्ता जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिर शेजारून धामणे येथील कलमेश्वर मंदिर शेजारी पोहोचला आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी हा रस्ता शासनाकडून पक्का करण्यात आला होता. हा रस्ता धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील वाहनधारकांना शहराच्या पूर्व भागात जाण्यासाठी सोयीचा असून बस्तवाड गावापासून आलेला रस्ता जुने बेळगावपासून 2 कि.मी. अंतरावर जोडला आहे. त्यामुळे बस्तवाड गावच्या वाहनधारकांना वडगाव, टिळकवाडी भागात जाण्यासाठी सोयीचे आहे. त्याचप्रमाणे जुने बेळगाव, वडगाव भागातील शेतकऱ्यांना आणि धामणे येथील शेतकऱ्यांना हा रस्ता सोयीचा आहे.परंतु या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना या रस्त्याने वाहन चालवतेवेळी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता अरुंद असून एका बाजूने मोठा नाला असून दुसऱ्या बाजूला खोलवर शेती आहे. या रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहनचालकांना या रस्त्याने वाहन चालविताना खड्डे चुकवितेवेळी बरेच वाहनचालक नाल्यात आणि शेतात पडून जखमी झाले आहेत. गेल्या महिन्यात जुने बेळगावपासून एक कि. मी. अंतरावर ओबडधोबड पॅचवर्क केले आहे. उर्वरित साडेतीन कि. मी. रस्त्यावरील खड्डे तसेच राहिल्याने वाहनधारकांना त्रासदायक झाले आहे. निदान आतातरी हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी धामणे-जुने बेळगावमधील वाहनधारकांतून होत आहे.









