मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, 200 पशुचिकित्सा केंद्रांना नव्या इमारती मिळणार : निधीची तरतूद
बेळगाव : सरकारमार्फत नव्या गोशाळा सुरू करण्याऐवजी सध्या गोशाळांमधील जनावरांच्या देखभालीसाठी अनुदान खर्च करण्याचा निर्णय गुरुवार दि. 2 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 2021-22 च्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्याला 1 ते 30 पर्यंत सरकारी गोशाळा सुरू करण्याचे तसेच 16 जिल्ह्यांमध्ये सरकारी गोशाळांमध्ये जनावरांच्या देखभालीसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. प्रत्येक गोशाळेला शेड, चारा व पाण्याची व्यवस्था, कार्यालये, कर्मचारी विश्रांतीगृह यासारख्या सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट होते. नव्या 35 गोशाळांच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. यापैकी 14 गोशाळांचे काम पूर्ण झाले आहे.
या गोशाळांमध्ये कोणतेही जनावर अद्याप दाखल झाले नसल्याने नवीन गोशाळा स्थापन करण्याऐवजी सध्या असलेल्या गोशाळांमध्येच जनावरे पाळून त्यांची देखभाल करण्याचा निर्णय झाला होता. 2022-23 अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या 10.50 कोटी अनुदान गोशाळांच्या देखभालीसाठी खर्च करण्याचे तसेच आवश्यक असणाऱ्या 14 जिल्ह्यांमध्ये निविदा मागवून गोशाळा सुरू करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्णय झाला होता. एकूण योजना खर्चापैकी 10.50 कोटी रुपये खर्च असून बेळगाव, कारवार, हासन, बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, मंड्या, मंगळूर, धारवाड, उडुपी, म्हैसूर, तुमकूर, बिदर येथील गोशाळांसाठी प्रत्येकी 2.50 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
पशुचिकित्सा केंद्र
भाडेतत्त्वावरील इमारतीत व शिथिल बनलेल्या इमारतींमध्ये सुरू असलेल्या पशुचिकित्सा केंद्रांना नवीन इमारती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 200 इमारतींमध्ये सध्या ही पशुचिकित्सा केंद्रे सुरू आहेत. 100 कोटी रु. खर्चामधून नव्या इमारती बांधण्याला अनुमती मिळण्यात आली आहे. नाबार्डच्या मदतीने नव्या इमारती बांधण्यात येणार आहेत.









