नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांची घोषणा : जलसंवर्धनासाठी ठोस योजना आखण्याची गरज
प्रतिनिधी /फोंडा
अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला असून आज इतर राष्ट्रांना भारताकडून धान्याची निर्यात केली जाते. केंद्र सरकारकडून गोव्याला मुबलक धान्य पुरवठा केला जातो. हे धान्य साठवण्यासाठी राज्यात सुरक्षित गोदामाच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष घालणार असल्याची घोषणा कृषी व नागरीपुरवठा मंत्री रवी नाईक यांनी केली. कृषी उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होतानाच जलसंवर्धनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
भारत सरकारच्या खाद्य निगम मंडळातर्फे फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित केलेल्या अन्न योजना व वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नागरी पुरवठा खात्याचे संचालक सुधीर केरकर, खाद्या निगम मंडळाचे विभागीय व्यवस्थापक घनश्याम महाले, फोंडय़ाचे नगराध्यक्ष रितेश नाईक व महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालिका दीपाली नाईक हे उपस्थित होते.
देशभरात धान्य पुरवठय़ामध्ये केंद्रातील मोदी सरकारने अमुलाग्र सुधारणा केल्या आहेत. देशातील गरीब नागरिक अन्नावाचून उपाशी राहणार नाहीत व भूकबळीने कुणालाही मरण येणार नाही याची सरकार काळजी घेत आहे, असे रवी नाईक पुढे म्हणाले. गोव्यात मुबलक धान्यसाठा असून तो सुरक्षित ठेवण्यासाठी गोदामांची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरी पुरवठा खात्याकडे असलेली गोदामे सुसज्ज बनवली जातील. शिवाय खाद्य निगम मंडळाच्या प्रस्तावाचा विचार करुन त्यांना गोव्यात गोदामे उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसवंर्धनातून पाण्याची निर्यात शक्य
सध्या अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रालाही भविष्यातील जलटंचाईची चिंता लागून राहिली आहे. गोव्यात भरपूर पाऊस पडतो. हे पाणी वाया न घालवता त्याची योग्य पद्धतीने साठवून व नियोजन करुन इतर राज्यांना व विदेशात पाण्याची निर्यात करणे शक्य आहे. त्यासाठी ठोस योजना आखण्याची गरज रवी नाईक यांनी व्यक्त केली. सुधीर केरकर यांनी कोरोना काळात प्रत्येक कुटुंबापर्यंत व्यवस्थितपणे धान्य पुरवठा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या नागरी पुरवठा खात्याची प्रशंसा केल्याचे सांगितले. यापुढेही गोव्यात शंभर टक्के लोकांपर्यंत धान्य पुरवठय़ाची हमी त्यांनी दिली. दीपाली नाईक यांनी राज्यात धान्य साठवण्यासाठी गोदामांचा तुटवडा भासू नये यासाठी वेर्णा येथील जागा ताब्यात घेण्याची सूचना केली. गोदामे उभारताना वाहतुकीची व्यवस्था जवळपास असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ही जागा योग्य असून साकवाळ येथे अशीच वापरावीना असलेली अन्य दोन गोदामे नागरी पुरवठा खात्याने ताब्यात घेतल्यास राज्यातील गोदामांचा प्रश्न सुटणार असल्याचे त्या म्हणाल्या.
घनश्याम महाले यांनी खाद्य निगम मंडळाला गोव्यात प्रशस्त अशी गोदामांची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंत्री रवी नाईक यांच्यासमोर मांडला. राज्य सरकारने त्यासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यास खाद्य मंडळ गोदाम उभारू शकेल, असे ते म्हणाले. मंत्री रवी नाईक यांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करून व सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी केंद्र सरकारच्या खाद्य निगम अंतर्गत देशात सुरु असलेल्या धान्य उत्पादन व साठवणूक योजनेची माहिती देणारे लघुपट दाखविण्यात आले.









