जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलग दुसऱ्या वर्षी भारताला पराभव पत्करावा लागल्याने एकूणच भारतीय संघासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसतात. मागील वर्षी न्यूझिलंडकडून हार स्वीकारावी लागल्यानंतर कसोटी जगज्जेतेपदाची हुकलेली संधी यंदा संघ साधेल, अशी तमाम क्रिकेट रसिकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात भारतीय संघाची कामगिरी पाहता त्याला हाराकिरीचीच उपमा द्यावी लागेल. नाणेफेक जिंकल्यानंतर वातावरणाची स्थिती पाहता भारताने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणे, हे एकवेळ समजून घेता येईल. तथापि, पहिल्या डावाच्या प्रथम सत्रात तीन झटपट बळी घेणारी गोलंदाजांची फळी त्यानंतरच्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर इतकी कशी हतबल होते, हे अनाकलनीय होय. वास्तविक, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा यांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र, स्मिथ आणि हेडला रोखण्यात आलेल्या अपयशाने सगळ्यावरच पाणी फेरले, असे म्हणता येईल.

परदेशी खेळपट्ट्या या द्रुतगती गोलंदाजांकरिता अनुकूल मानल्या जातात. त्यामुळे अशा गोलंदाजांची फौज दिमतीला असणे, आवश्यकच. तथापि, अश्वीनसारख्या हुकमी गोलंदाजाला वगळून उमेश यादवला खेळविणे, हा आत्मघातच ठरल्याचे दिसून येते. अश्वीनच्या गोलंदाजीत विविधता आहे. अनुभवाबरोबरच फलंदाजाचे कच्चे दुवे हेरण्यात तो वाकबगार असल्याने मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून देण्याची भूमिका त्याने वेळोवेळी नेटाने पार पाडली आहे. त्यामुळे अश्वीन असता, तर स्मिथ आणि हेडला इतकी मुक्तपणे फलंदाजी करता आली असती का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. गोलंदाजांनी संधी गमावल्यानंतर फलंदाज काय करामत करतात, याकडे समस्त क्रिकेटवासियांचे लक्ष होते. परंतु, परदेशी खेळपट्टीवर आपले कागदी वाघ मर्दुमकी गाजवू शकले नाहीत. अपवाद केवळ अजिंक्य रहाणेचा. खराब फॉर्ममुळे रहाणेला संघातून वगळण्यात आले होते. स्वाभाविकच हा मुंबईकर फलंदाज पुन्हा कधी संघात दिसेल, अशी अपेक्षाही कुणी केली नसावी. मात्र, रणजी क्रिकेट स्पर्धेत खोऱ्याने धावा करणाऱ्या अजिंक्यने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंगच्या विजेतेपदातही मोलाचे योगदान दिले. धोनीचा विश्वास सार्थ ठरविणाऱ्या अजिंक्यने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेकरिता झालेल्या निवडीचेही सोने केले, असेच म्हणावे लागेल. सारे रथी महारथी एकामागोमाग एक कोसळत असताना मैदानात नेटाने उभे राहण्याची त्याने दाखविलेली जिगर वाखाणण्याजोगी होय. विशेषत: जायबंदी झाल्यानंतरही तो ज्या पद्धतीने लढला, ही जिद्द अनुकरणीय ठरते. अजिंक्यकडे क्लास आहे. तंत्रशुद्धता, अचूक टायमिंग या बळावरच परदेशी खेळपट्ट्यांवर त्याचेसारखे खेळाडू यशस्वी ठरतात. भविष्यात आपल्या खेळाचा दर्जा कायम राखतानाच सातत्यपूर्ण खेळावर त्याला भर द्यावा लागेल. कर्णधार रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली या वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी सुमारच म्हटली पाहिजे. या त्रिकुटाला आपला फॉर्म पुन्हा मिळविण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाठवावे आणि कसोटीत नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशीही चर्चा सध्या सुरू आहे. अर्थात कामगिरी अशीच ढेपाळणारी असेल, तर आज ना उद्या हा मार्ग अवलंबावाच लागेल. श्रीकर भारतची कामगिरीही निराशाजनकच असून, यष्टीरक्षक हा आता चांगला फलंदाज असायलाच हवा. मधल्या काळात दोन संघ असावेत का, यावरही बराच ऊहापोह झाला होता. अर्थात मागच्या काही वर्षांत नवनवीन क्रिकेटपटूंची पुढे येणारी नावे पाहता भारतात दोनच काय असे तीन संघही तयार होतील, अशी स्थिती आहे. असे दोन संघ तयार असणे कधीही श्रेयस्कर. एकूणच जागतिक क्रिकेटचा विचार केला, तर भारतीय क्रिकेटपटूंइतके कुणी क्रिकेट खेळत नसावेत. त्यामुळे अतिक्रिकेटने कामगिरीवर परिणाम होत नसेल ना, असे म्हणण्यास नक्कीच जागा आहे. म्हणूनच बीसीसीआयने दौऱ्याची आखणी करताना खेळाडूंना मधल्या टप्प्यात कशी विश्रांती देता येईल, याचा विचार केला पाहिजे. यासंदर्भात कसोटी जगज्जेतेपद लढत आयपीएलनंतरच का होते, ही लढत मार्चमध्ये का होत नाही, हा कर्णधार रोहित शर्माचा सवालही बरेच काही सांगून जातो. रोहितच्या म्हणण्यातील तथ्य मान्य केले, तरी खेळाडू कसोटी वा तत्सम जागतिक स्पर्धांऐवजी आयपीएललाच का प्राधान्य देतात, याचे उत्तरही त्याने द्यायला हवे. मुळात आयपीएल ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी मानली जाते. बीसीसीआय असो वा क्रिकेटपटू. आयपीएलसारख्या झटपट पैसे देणाऱ्या स्पर्धेकडील त्यांचा कल लपून राहत नाही. मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा वा वन डे स्पर्धेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे मी आयपीएल खेळणार नाही, अशी भूमिका कोणत्या खेळाडूने घेतल्याचे ऐकीवात आहे का? भविष्यात वरिष्ठ खेळाडूंनी तरी असा दृष्टीकोन ठेवायला हवा. त्याचबरोबर रोटेशन पद्धतीचाही अवलंब करायला हवा. जेणेकरून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याबरोबरच नव्या टॅलेंटलाही संधी मिळेल. शिवाय संघाला कुणी गृहीतही धरणार नाही. कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीऐवजी मालिका घेतली जावी, हा रोहित शर्मा याने मांडलेला प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. मात्र, भारतीय संघाला यश मिळाले असते, तर त्याने हीच भूमिका घेतली असती का? विश्वचषक क्रिकेट स्पर्धेकरिताही एकच अंतिम सामना होतो. आयपीएलसाठीही एकच फायनल होते. त्यामुळे रोहितचा हा प्रस्ताव म्हणजे शुद्ध पळवाट ठरते. कसोटी जगज्जेतेपदासाठी एकच लढत होणार, हे आपण ठरविले आहे. त्यामुळे उगाच त्यावर काथ्याकूट करून पराभव लपविण्यापेक्षा आत्मपरीक्षण करून संघ कसा सक्षम करता येईल, हे पहायला हवे. आयपीएल, वन डे, कसोटी हे तिन्ही फॉरमॅट वेगळे आहेत. कसोटीकरिता कमालीचा संयम, टायमिंग व तंत्रशुद्धता लागते. खेळाडू कायम आयपीएलच्या मूडमध्ये असतील, तर कसोटी व वन डे क्रिकेटला ते पुरेसा न्याय देऊ शकणार नाहीत. म्हणूनच भविष्यात स्वत:ला सिद्ध करायचे असेल, तर भारतीय खेळाडूंनी ‘क्लास’वर अधिक भर द्यायला हवा. फॉर्म इज टेंपररी, क्लास इज परमनंट, असे म्हणतात, ते उगीच नाही.








