21 पैकी 11 कॉरिडॉर मध्यप्रदेशात : राजस्थानात 3 : राज्यांमध्ये जलदपणे होतेय कार्य
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2024 च्या लोकसभा निवडणुकीत बहुचर्चित तीर्थस्थळांच्या विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. याचमुळे राज्य सरकारांकडून मंदिर विकास आणि धार्मिक कॉरिडॉरवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. मागील 2-3 वर्षांमध्ये सोमनाथ मंदिर, काशी विश्वनाथ, महाकाल मंदिर कॉरिडॉर निर्माण झाले आहेत. उत्तरप्रदेशात मथुरा-वृंदावन, अयोध्या, आसाममध्ये गुवाहाटीत कामाख्या मंदिर कॉरिडॉरचे काम सुरू आहे.
देशात सध्या सुमारे 13 हजार कोटी रुपयांच्या 21 मंदिर कॉरिडॉर्सचे काम सुरू आहे. सर्वाधिक 11 कॉरिडॉर मध्यप्रदेशात निर्माण केले जात आहेत. या सर्व कॉरिडॉरचे कार्य 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संपविण्याचे लक्ष्य राखण्यात आले आहे. 2024 च्या प्रारंभी अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
तर मध्यप्रदेशच्या चित्रकूटमध्ये वनवासी रामपथ, ओरछामध्ये रामराजा लोक, दतियामध्ये पीतांबर पीठ कॉरिडॉर, इंदोरमध्ये अहिलया नगरीय लोक, महूचे जानापाव, बिहारमध्ये उच्चैट भगवती स्थानापासून महिषी तारास्थानला जोडण्याचे काम सुरू झाले आहे. राजस्थान सरकार देखील गोविंददेव मंदिर, तीर्थराज पुष्करसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. महाराष्ट्रातही धार्मिक स्थळांना जोडणारा कॉरिडॉर निर्माण केला जात आहे.

राजस्थानात तीन कॉरिडॉर
राजस्थानात 300 कोटी रुपयांच्या निधीतून तीन कॉरिडॉर निर्माण केले जात आहेत. यातील 100 कोटी रुपये गोविंद देव मंदिर, 100 कोटी रुपये तीर्थराज पुष्कर आणि 100 कोटी रुपये बेनेश्वरधामच्या विकासासाठी खर्च केले जाणार आहेत.
उत्तरप्रदेश : रामजन्मभूमी कॉरिडॉर
100 हेक्टरचा मथुरा-वृंदावन कॉरिडॉर अमेरिकन कंपनीकडून 250 कोटी रुपयांमध्ये तयार केला जात आहे. कॉरिडॉरद्वारे गोकुळ, नंदगाव आणि बरसाना यांना जोडले जाणार आहे. अयोध्येत 797.69 कोटी रुपयांद्वारे रामजन्मभूमी कॉरिडॉर तयार केला जात असून तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. यातील 379 कोटी रुपये भूमी अधिग्रहणावर खर्च होतील.
मध्यप्रदेश : ओंकारेश्वरावर सर्वाधिक खर्च
छिंदवाडामध्ये 314 कोटी रुपयांच्या निधीतून हनुमान मंदिर लोक, सलकनपूरमध्ये श्रीदेवी महालोक, सागरमध्ये रविदास धाम, दतियामध्ये पीतांबरा लोक, ओरछामध्ये रामराजा लोक, चित्रकूटमध्ये 100 कोटी रुपयांच्या निधीतून रामपथ गमन लोक, इंदोरमध्ये 25 कोटी रुपयांच्या निधीतून अहिल्यानगरी लोक, 10 कोटी रुपयांद्वारे जानापाव लोक, ओंकारेश्वरमध्ये 2200 कोटी रुपयांच्या निधीतून ओंकारेश्वर लोक तयार केला जात आहे. तर ग्वाल्हेरमध्ये शनिलोक आणि बडवानीमध्ये नाग लोकची घोषणा करण्यात आली आहे.
आसाम : कामाख्या मंदिर
आसाममधील कामाख्या मंदिर परिसराचा विकास केला जात आहे. 500 कोटी रुपयांच्या मदतीने या मंदिराच्या परिसराचा आकार 3 हजार चौरस फुटांवरून 10 हजार चौरस फूट केला जाणार आहे.
गुजरात : अभूत द्वारका नगरी
गुजरातमध्ये ओखापासून बेट द्वारकेला जोडणाऱ्या चारपदरी पूलाकरता 870 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.









