पावसाची उसंत, विविध मार्गावर वृक्ष लागवड
बेळगाव : सामाजिक वनीकरण विभागाने यंदाच्या हंगामात 1 लाख 67 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसाने उद्दिष्ट अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय लागवड झालेल्या रोपांचेही जतन झाले आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत उद्दिष्ट पूर्णत्वाला जाणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाने दिली आहे. वनखाते आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवडीवर भर देण्यात येतो. पर्यावरणाचा समतोल राखावा आणि वृक्षांची संख्या वाढावी, यासाठी ही वृक्ष लागवड केली जाते. जिल्ह्यात एक कोटी रोप लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या हंगामात दीड लाखाहून अधिक रोपांची लागवड केली जाणार आहे. शासनाच्या कोटी वृक्ष अभियान अंतर्गत जिल्हा पंचायत, वनखाते, बागायत खाते आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत ही मोहीम राबविली जात आहे. विशेषत: रस्त्याच्या दुतर्फा, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी शाळा, खुल्या जागा आणि इतर ठिकाणी वृक्ष लागवड केली जात आहे. यामध्ये जांभूळ, चिक्कू, वड, बेल, फणस आदींचा समावेश आहे. यासाठी रोजगार हमी योजनेतून खड्ड्यांची खोदाई करण्यात आली आहे. मागील आठवड्याभरापासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीला जोर आला आहे. विविध ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यातून विविध रोपांची लागवड होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काळात रस्ते आणि शासकीय कार्यालये हिरवळीने फुलण्याची शक्यता आहे.









