सामनावीर आयान अफझल खान
वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत शनिवारी रात्री खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातने (युएई) बलाढ्या न्यूझीलंडचा 7 गड्यांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात युएईचा कर्णधार मोहमद वासीमने शानदार 55 धावांची खेळी केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 142 धावा जमवल्या होत्या. त्यामुळे युएईला 143 धावांचे आव्हान मिळाले. युएई संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले.
न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीचा बोवेस, आणि जिमी निशम यांनी प्रत्येकी 21 धावा तर चॅपमनने 63 धावा जमवल्या. न्यूझीलंडचे हे तीन फलंदाज वगळता इतरांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. युएईच्या अफझल खानने न्यूझीलंडची वरची फळी झटपट बाद केली. त्याने आपल्या फिरकीवर न्यूझीलंडच्या सँटेनर व क्लेव्हर यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. मार्क चॅपमनने 63 धावांचे योगदान दिले. युएईच्या अफझल खानने 20 धावात 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युएईच्या डावात सलामीचा ए. शर्मा खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. त्यानंतर वासीम आणि व्ही. अरविंद यांनी संघाच्या डाव सावरला. कर्णधार मोहमद वासीमने 29 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 55 धावांची खेळी केली. असिफ खानने नाबाद 48 धावा झोडपल्या. त्याने साऊदीच्या षटकात 3 चौकार ठोकून अमिरात संघाला 26 चेंडू बाकी असताना 7 गड्यांनी विजय मिळवून दिला. या मालिकेतील गेल्या गुरुवारी झालेला पहिला सामना न्यूझीलंडने 19 धावांनी जिंकला होता. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना दुबाईमध्ये रविवारी खेळवला जात आहे.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकात 8 बाद 142 (चॅपमन 63, बोवेस 21, निशम 21, अफझल खान 3-20), युएई 15.4 षटकात 3 बाद 143 (मोहमद वासीम 55, असिफ खान नाबाद 48).









