पावसाळी हंगामासाठी खास नियोजन : खास पथक ठेवणार 24 तास देखरेख,महामार्गाचा ताबा राष्ट्रीय महामार्ग गोवा विभागाकडे
वाळपई : गोवा-बेळगाव दरम्यानच्या चोरला परिसरातील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर नियंत्रण राखण्यासाठी सरकारची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्यास ताबडतोब रस्ता मोकळा करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांना अडचणी निर्माण होऊ नये यासाठी निर्देश देण्यात आल्याची माहिती सतरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग यांचा गोवा राज्यातील विभागाने यासाठी नियोजन केले असून सुमारे चार महिने या महामार्गावर व्यवस्थापन सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गोवा कर्नाटक या दोन्ही राज्यांना जोडणारा चोरला हा महत्त्वाचा मार्ग आहे. रामनगर, अनमोड त्याचप्रमाणे तिलारी मार्गावरूनही कर्नाटक भागामध्ये जाता येते. मात्र चोरला सुरक्षित व कमी पल्ल्याचा आहे. त्यामुळे जास्तीतजास्त लोक याच मार्गाचा अवलंब करतात. सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे व्हावे यासाठी सातत्याने नागरिकांकडून मागणी करण्यात येत असते. याची दखल घेऊन हा महामार्ग केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाकडे देण्यात आला होता. मात्र या रस्त्याचे व्यवस्थापन त्यांच्याकडून प्रभावीपणे होऊ शकणार नाही. याची दखल घेऊन पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने या महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग गोवा विभागाकडे देण्यात आलेली आहे. यामुळे यंदाच्या पावसात गोवा विभागातर्फे या रस्त्यावर व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
सांखळी ते बेळगाव यादरम्यानच्या महामार्गापैकी चोरला घाट परिसरातील महामार्ग हा पावसाळ्यात अत्यंत धोकादायक बनतो. डोंगराळ भागातून हा रस्ता गेल्यामुळे अचानक दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात. गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ लागलेली आहे. यामुळे अनेक वेळा या महामार्गावरील वाहतूक सातत्याने ठप्प होत असते. याची विशेष दखल घेऊन गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याची यंत्रणा सज्ज करण्यात येत असते. यंदाही अशाच प्रकारे यंत्रणा सज्ज करण्यात आल्याचे प्रवीण परब यांनी स्पष्ट केले. या संदर्भाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून रस्त्यावर 24 तास यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी, असे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.
कर्मचाऱ्यांचे पथक 24 तास तैनात करणार
चोरला महामार्ग घाट परिसरातून जात असल्यामुळे दरडी कोसळण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असते. यामुळे रात्री अपरात्री वाहतूक ठप्प होत असते. यामुळे अनेकवेळा प्रवासी जंगलामध्ये अडकून पडतात. याची विशेष दखल घेऊन या ठिकाणी 24 तास कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्यास ताबडतोब या दरडी हटविण्याच्या कामाला सुऊवात करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला अद्याप सरकारकडून मान्यता मिळाली नाही. मात्र चार दिवसांत या प्रस्तावाला निश्चितच मंजुरी मिळण्याची आशा आहे.
रात्रीच्यावेळी तैनात करणार खास पथक
विशेषत: रात्रीच्यावेळी खास पथक तैनात करण्यात येणार असून यदाकदाचित या घाट परिसरामध्ये धोका निर्माण झाल्यास त्याची सूचना संबंधित यंत्रणा देऊन या भागातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. असे प्रवीण परब यांनी स्पष्ट केले आहे.
पावसाळ्या यंत्रणा राहणार सज्ज : गावडे
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग गोवा विभागाचे अधिकारी गावडे यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना पावसाळ्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. यामुळे कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. तरीही पावसात कोणत्याही क्षणी दरडी कोसळण्याचे प्रकार होऊ शकतात. त्याचप्रमाणे या महामार्गावरील धोकादायक झाडे रस्त्यावर पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. यासाठी खास पथक तैनात करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता आहे तेथील दरडी हटविण्याच्या कामालाही सुऊवात करण्यात येणार आहे. या संदर्भात प्रस्ताव लवकरच मंजूर होण्याची अपेक्षा आहे. असे गावडे यावेळी म्हणाले.









