वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली विमानतळावर शनिवारी काही वेळासाठी संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्याअंतर्गत रुग्णवाहिका, अग्निशमन दल आदींना पाचारण करण्यात आले. दिल्ली विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या फेडएक्स कार्गो विमानाने उड्डाण घेतल्यानंतर 1000 फूट उंचीवर एक पक्षी विमानाला धडकला, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडे विमान उतरवण्यासाठी परवानगी मागण्यात आली. नियंत्रण कक्षाकडून सिग्नल प्राप्त होताच विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संपूर्ण कार्गो विमानाची तपासणी करण्यात आली. नंतर ते पुन्हा दुबईला पाठवण्यात आले. इमर्जन्सीच्या काळात सर्व आपत्कालीन यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले होते. मात्र, या हालचालींदरम्यान कोणतीही अनुचित घटना न घडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.









