182 प्रवासी बालंबाल बचावले ः दम्मामला जाणाऱया विमानात तांत्रिक बिघाड
तिरुवनंतपुरम / वृत्तसंस्था
केरळमधील तिरुवनंतपुरम विमानतळावर शुक्रवारी काहीवेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. कालिकतहून दम्मामला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान तांत्रिक कारणामुळे वळवण्यात आल्यानंतर तिरुवनंतपुरम विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर लगेचच तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. हायड्रोलिक उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने कालिकतहून दम्मामला जाणारे विमान वळवण्यात आले. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान दुपारी 12.15 वाजता विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यामुळे तब्बल 182 प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करत असताना शुक्रवारी सकाळी 182 प्रवाशांना घेऊन जाणाऱया एअर-इंडिया एक्स्प्रेस आयएक्स-385 विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. त्यानंतर सुरक्षित लँडिंग करण्यासाठी अरबी समुद्रात इंधन काढल्यानंतर विमान तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरवण्यात आले. विमानातील वैमानिकांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर यशस्वीपणे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचू शकले. वैमानिकांनी विमान उतरवण्यापूर्वी प्रथम विमानाचे इंधन समुद्रात सोडले आणि त्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग अतिशय सुरक्षितपणे केले. उड्डाण वळवल्यानंतर लगेचच तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्णपणे आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली होती. यापूर्वी रविवारीदेखील विमान कंपनीला दुबई-तिरुवनंतपुरम मार्गात तांत्रिक बिघाडाची समस्या आली होती. आजही असाच प्रकार घडल्याने विमानतळ प्रशासन तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









