कोलंबो
श्रीलंकेचे हंगामी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. देशातील परिस्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत 4 महिन्यांत चौथ्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राजपक्षे सरकारने 1 एप्रिल रोजी प्रथमच गरीब असलेल्या श्रीलंकेत आणीबाणी लागू केली. 5 एप्रिल रोजी आणीबाणी उठवण्यात आली. 6 मे रोजी पुन्हा 20 मे पर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपतींच्या पलायनादरम्यान 13 जुलै 2022 रोजी तिसऱयांदा आणीबाणी घोषित करण्यात आली होती. अजूनही देशात आंदोलने होत असल्यामुळे आता पुन्हा एकदा आणीबाणी जाहीर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चालू आठवडय़ात येथे राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असल्याने लोकांना शांत करण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लादले जात आहेत. तथापि, सरकारविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेल्या सर्वसामान्य जनतेने अद्याप आंदोलनातून माघार घेतलेली दिसत नाही.