दापोली नगर पंचायतीमधील प्रकार , सुमारे सहा कोटींच्या अपहाराची तक्रार
प्रतिनिधी/ दापोली
येथील नगर पंचायतीचे निलंबित लेखापाल दीपक सावंत (44) याच्यावर तब्बल 5 कोटी 81 लाख 10 हजार 309 रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली नगर पंचायतमध्ये 1 जानेवारी 2003 पासून दीपक सावंत लेखापाल पदावर कार्यरत होता. त्याने आपल्या कार्यकाळात 50 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला होता. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. तत्पूर्वी नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी देवानंद ढेकळे यांनी दापोली पोलीस स्थानकात या बाबत लेखी तक्रारही दिली होती. यानंतर दापोली पोलिसांच्यावतीने संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू होते. अखेर सोमवारी रात्री दीपक सावंत याच्यावर नगर पंचायतीमध्ये 5 कोटी 81 लाख 10 हजार 309 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सावंतने अपहाराच्या उद्देशाने नगर पंचायतीच्या विविध बँक खात्यांची दोन कॅश बुक तयार केली. त्यामध्ये शासनाची फसवणूक करण्याच्या हेतूने वेगवेगळा तपशील नोंदवला. अपहार लपवण्यासाठी व पुरावे नष्ट करण्यासाठी अभिलेख गहाळ करून 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत नगर पंचायतीच्या विविध खात्यांमध्ये शासनाकडून आलेल्या विविध निधीतून नगर पंचायतीच्या स्वनिधी खात्यातून श्री एंटरप्राईजेस, मंगेश पवार, शंकर माने, वरदा प्रोजेक्ट, राहुल राठोड, हुदा एंटरप्राईजेस, नंदा एंटरप्राईजेस, शामल जाधव, सुरज कुमार या विविध खात्यांवर एकूण 5 कोटी 81 लाख 10 हजार 309 रुपये वर्ग केले. यामुळे दीपक सावंत याने पदाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केली, असे नमूद करण्यात आले आहे.
नगर पंचायतीचे लेखापाल सिद्धेश खामकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक सावंत याच्यावर भादंवि 409, 420, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद करत आहेत.









