कोल्हापूर :
बोलोली (ता. करवीर) येथील केदारलिंग विकास सेवा सोसायटीमध्ये सचिव जोतिराम कृष्णा कारंडे व लिपिक सुनील विलास कारंडे यांनी 2 कोटी 53 लाख रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरिक्षणातून उघडकीस आले आहे. लेखापरिक्षक एम.डी. अस्वले यांनी लेखापरिक्षण केले असून संचालकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे हा अपहार झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे संचालक आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा अपहार केला असल्याचे गृहित धरून अपहाराची जबाबदारी संचालकांवरही का निश्चित करू नये ? याबाबतचा खुलासा सादर करण्यास सात दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचे लेखापरिक्षकांनी स्पष्ट केले आहे.
बोलोली गावांसह शिपेकरवाडी, कारंडेवाडी, विठ्ठलाईवाडी, स्वयंभूवाडी, दुर्गूळवाडी, मठाचा धनगरवाडा व मारुतीचा धनगरवाडा या सात वाड्या केदारलिंग विकास संस्थेशी जोडल्या आहेत. 1046 सभासद असून सुमारे 93 लाख रूपये भागभांडवल आहे. वार्षिक 3 कोटी 50 लाख रुपये ‘कमाल मर्यादा’ मंजुरी असते. पण 2023-24 मधील वैधानिक लेखापरिक्षणावेळी रुजवातीअंती 2 कोटी 4 लाख 566 रुपये अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. तर 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 मध्ये शेअर्स रोखीने अदा करून 9 लाख 70 हजारांचा अपहार, 1 एप्रिल 23 ते 31 मार्च 24 अखेर मेंबर शेअर्स ऐवजी ठेव रक्कम रोखीने अदा करून 5 लाख 98 हजार, अनामत खाते जमा नसताना 2 लाख 80 हजार रक्कम अदा केली. डिव्हिडंट वाटप रजिस्टरप्रमाणे देणे डिव्हीडंट रकमेपेक्षा 16 हजार रूपये जादा रक्कम अदा केली. खत माल विक्री रजिस्टरप्रमाणे जमा असलेली रक्कम किर्दिस जमा न घेता 26 हजार रुपयांचा अपहार केला. खर्च बिले व व्हाऊचर नसताना 1 लाख 81 हजार रूपये खर्च दाखविला. 31 मार्च 24 अखेर रोख शिल्लक संस्थेत अथवा संस्थेच्या बँक खात्यामध्ये भरणा न करता 31 लाख 36 हजार रूपयांवर डल्ला मारला.तर 1 एप्रिल 2024 ते 28 फेब्रुवारी 2015 अखेर रोख शिल्लक वापरावरील बँक व्याज दराप्रमाणे (13 टक्के) 5 लाख्घ् 63 हजारांचा अपहार लेखापरिक्षणाच्या अहवालात नमूद आहे. सर्व बाबींचा विचार करता एकूण 2 कोटी 53 लाख 99 हजार 520 रूपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- केवळ सचिव व क्लार्कच नव्हे तर संचालकही जबाबदार
संस्था पोटनियमाप्रमाणे संस्था कर्मचाऱ्यांवर नियंत्रण अंतर्गत तपासणी करणे, रोख शिल्लक व शिल्लक माल पडताळणी करणे, क.म.पत्रकावर सह्या करणे, कर्जरोखे तयार करून घेणे, कर्जास मंजुरी देणे आदी कामकाज संचालक मंडळाने करणे गरजेचे आहे. पण या कामात संचालकांनी कसुर केला असून झालेल्या अपहाराबाबत सचिव आणि क्लार्कसोबतच संचालक मंडळासही का जबाबदार धरू नये ? याबाबतचा संचालकांनी सात दिवसांत खुलासा करण्याच्या सूचना लेखापरिक्षक आस्वले यांनी दिल्या आहेत.
- सहकार विभागाने दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत
केदारलिंग विकास संस्था ही बोलोलीसह परिसरातील वाड्यावस्त्यांची अर्थवाहिनी आहे. पण याच संस्थेच कोट्यावधीचा अपहार करून काहींनी स्वत:चा स्वार्थ साधला आहे. त्यामुळे अपहार करणाऱ्या दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत.
सागर राणे , संस्था सभासद, बोलोली.








