नवी दिल्ली :
नवी दिल्लीतील स्वत:चा दूतावास स्थायी स्वरुपात बंद करण्याची घोषणा अफगाणिस्तानने केली आहे. नवी दिल्लीतील दूतावास बंद करण्याचा निर्णय 23 नोव्हेंबरपासून अंमलात आणला गेल्याचे वक्तव्यात नमूद करण्यात आले आहे. भारतात सातत्याने आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे अफगाणिस्तानने म्हटले आहे. नवी दिल्लीत अफगाणिस्तान दूतावासाचे संचालन 30 सप्टेंबरपासून बंद आहे. भारत सरकारकडून सहकार्य न मिळाल्याने दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अफगाणिस्तान सरकारने म्हटले आहे. धोरणांमध्ये झालेले मोठे बदल आणि हित विचारात घेत भारतातील दूतावास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूतावासाला समर्थन दिल्याप्रकरणी भारत सरकारचे आभार मानतो असे अफगाण सरकारने म्हटले आहे.









