वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क चालू वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर झालेल्या संभाषणाच्या एक दिवसानंतर, शनिवार, 19 एप्रिल रोजी मस्क यांनी स्वत:च ही घोषणा केली. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंबंधी माहिती दिली. ‘पंतप्रधान मोदींशी बोलणे हा मोठा सन्मान होता’ असे स्पष्ट करतानाच ‘या वर्षाच्या अखेरीस भारतात येण्यास मी उत्सुक आहे’ असे ट्विट मस्क यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात सहकार्याच्या अफाट शक्यतांवर दोघांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती शेअर केली होती. पंतप्रधान मोदी यांनी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजीच्या अमेरिका दौऱ्यावेळी मस्क यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती.









