ट्रम्प यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळख असलेले इलॉन मस्क यांनी आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी सौम्य भूमिका घेण्याचा संकेत दिला आहे. माझ्या सोशल मिडियावरील संदेशांमध्ये मी नको एवढे बोलून गेला, असा पश्चाताप त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याशी पुन्हा जुळवून घेण्याचा त्यांचा विचार असल्याचे दिसून येत आहे.
मात्र, ट्रम्प यांनी अद्याप त्यांच्या या नव्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. गेल्या आठवड्यापासून दोघांमधील वाद विकोपाला गेला आहे. हा वाद ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणासंबंधीचा आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी आणि विकास दर वाढविण्यासाठी सढळ हस्ते सरकारी खर्च वाढविण्याची योजना आणली आहे. ती मस्क यांना मान्य नसल्याचे दिसून येते. खर्च वाढविल्याने अमेरिकेवर कर्जाचा भार अधिक वाढेल आणि वित्तीय तूट प्रमाणाबाहेर जाईल, असे मस्क यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
तीव्र शब्दांचा उपयोग
आपण साहाय्य केले नसते, तर डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची निवडणूक जिंकता आली नसती, असे गंभीर आणि तीव्र विधान मस्क यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी तितक्याच तीव्र भाषेत त्यांची नाराजी व्यक्त केली होती. आता मस्क यांच्याशी असलेले सर्व संबंध संपले आहेत, अशी घोषणाही त्यांनी केली होती. त्यानंतर, आता मस्क यांनी माघार घेण्यास प्रारंभ केला आहे, असे दिसून येत आहे. तथापि, दोघांमध्येही पुन्हा पूर्वीसारखे बंधुवत संबंध प्रस्थापित होतील काय, यावर तज्ञांकडून शंका व्यक्त केली जात आहे.
रिपब्लिकन पक्षाचे प्रयत्न
दोघांमधील वादामुळे अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाची हानी होत आहे, असे दिसून आल्यानंतर या पक्षाने दोघांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण प्रथम कोण मागे हटणार, हा तिढा न सुटल्याने वाद पुढेही होत राहील, अशी शक्यता आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्याकडे क्षमायाचना केल्यास किंवा खेद प्रगट केल्यास समन्वय होऊ शकतो, असे काही पत्रकारांचे मत आहे.
मस्क यांचे साहाय्य होतेच
अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून यावेत, म्हणून इलॉन मस्क यांनी व्यक्तीश: प्रयत्न केले होते. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारकार्याला त्यांनी अर्थसाहाय्य केले होते. तसेच प्रचारकार्यात भागही घेतला होता. त्यांच्या साहाय्याचा ट्रम्प यांना मोठा लाभही झाला होता. पण वादविवाद झाल्याने दोघांनीही अबोला धरला होता. आता सर्वकाही सुरळीत झाल्याचे पहावयास मिळेल असे बोलले जात आहे.









