अर्नाल्टला मागे टाकले : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी 10 व्या स्थानी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नाल्टला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान पुन्हा मिळवले आहे. टेस्लाचे समभाग हे 5.5टक्क्यांनी वाढून 207.63डॉलरवर पोहोचले आहेत. कारण मस्क यांची एकूण संपत्ती वाढली असल्याने त्यांनी हा टप्पा प्राप्त केल्याची नोंद केली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशाच्या निर्देशांकानुसार, मस्कची एकूण संपत्ती 187.1 अब्ज डॉलरवर (अंदाजे 15.4 लाख कोटी रुपये) पोहोचली आहे.
बर्नार्ड अर्नाल्ट, लुई व्हिटॉन मोएट हेनेसी सीईओ, जगातील सर्वात मोठे फॅशन ग्रुप, यांची एकूण संपत्ती 185.3 अब्ज डॉलर (अंदाजे 15.32 लाख कोटी रुपये) आहे. अरर्नाल्टच्या कामगिरीमुळे डिसेंबर मध्यात मस्क क्रमांक 1 वरून खाली घसरले होते. तेव्हापासून ते अव्वलस्थानी राहिले होते. अर्नाल्ट यांना आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर मानले जाते. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा अब्जाधीशांच्या पहिल्या दहा यादीत समावेश आहे.
टेस्लाच्या स्टॉकमध्ये यावर्षी 90टक्के वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये समभागांची किंमत ही 108 डॉलरपर्यंत घसरली होती. वर्षाच्या सुरुवातीला मस्कची एकूण संपत्ती 137 अब्ज डॉलर (अंदाजे रु. 11.33 लाख कोटी) होती.
मस्क लवकरच एआय चॅटबॉट आणणार
मस्क तंत्रज्ञानाच्या जगात काहीतरी मोठे करण्याचा विचार करत आहेत. द इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार, मस्क ओपनएआयच्या चॅटजीपीटीशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज होत आहेत. गेल्या आठवड्यात, मस्कने नवीन संशोधन प्रयोगशाळा तयार करण्यासाठी एआय संशोधकांशी संपर्क साधला. ताज्या माहितीनुसार, मस्कने त्याचा चॅटबॉट विकसित करण्यासाठी इगोर बाबुस्किन नावाच्या संशोधकाची नियुक्ती केली असल्याचे सांगितले जात आहे.









