पंतप्रधान मोदींकडून योजनेचा प्रारंभ, आरोग्य विभागाचा महत्वाकांक्षी प्रकल्प
वृत्तसंस्था / शहाडोल
देशात ‘सिकल सेल अॅनिमिया’ या रोगाचे प्रमाण वाढत असून त्याचा वेळीच नायनाट करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगाच्या उन्मूलन कार्यक्रमाचा शुभारंभ मध्यप्रदेशातील शहाडोल येथे केला आहे. या रोगाची माहिती, तो टाळण्यासाठीचे दिशानिर्देश आणि या रोगावरील उपाय यांची माहिती असलेल्या एका पोर्टलचा प्रारंभ त्यांनी केला. शनिवारी शहाडोल येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी येत्या दोन दशकांमध्ये हा रोग समूळ नष्ट करण्याच्या योजनेची माहिती लोकांना दिली. विशेषत: मध्यप्रदेशात हे प्रमाण अधिक आहे.
या रोगाकडे दुर्लक्ष केल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. या रोगामुळे रुग्णांची प्रतिकार शक्ती दुर्बळ होऊन त्याला रक्तक्षयाचा विकार जडतो. या रोगाचे व्यवस्थापन पहिल्या अवस्थेतच योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. भारताच्या वनवसी समाजामध्ये या रोगाचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्याच्या उन्मूलनासाठी व्यापक योजना हाती घेण्याची मागणी होत होती. तिचा विचार करुन केंद्र सरकारने ही योजना हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘गॅरेंटीं’ना फसू नका
काही राजकीय पक्ष बनावट गॅरेंटी देत आहेत. ज्या पक्षांना स्वत:चीच गॅरेंटी नाही ते लोकांना विविध आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल करीत आहेत. ही आश्वासने केवळ लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करण्यासाठी आहेत. ती अधिक काळ चालू शकत नाहीत. राजकीय स्वार्थासाठी ती दिली जात असून जनतेने आपली फसगत होऊ देऊ नये. मध्यप्रदेशात शेतकऱ्यांनाही अशी आश्वासने देण्यात आली आहेत. ती केवळ दिखावू आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी गेल्या 9 वर्षांमध्ये 15 लाख कोटींहून अधिक रक्कम खर्च केली असून शेतकऱ्यांचा कायमस्वरुपी लाभ व्हावा म्हणून प्रयत्न केले आहेत. देशातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला या ना त्या प्रकारे वर्षाला 50 हजार रुपये मिळावेत अशा प्रकारे योजना लागू करण्यात आल्या आहेत. केवळ काही काळासाठी लोकांना मोहात पाडण्याचा आमचा विचार नाही. शाश्वत विकासावर आमचा भर आहे, असा विकासच दीर्घकालीन लाभाचा असतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आत्मनिर्भरतेची महत्वाकांक्षा
भारताला आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण करण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे केंद्र सरकारचे ध्येय आहे. फुकट आश्वासनांची खैरात लोकांना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि परावलंबी करते. तसेच देशाचीही अर्थव्यवस्था अशामुळे रसातळाला जाते, अशा अर्थाचे प्रतिपादन त्यांनी लोकांना आकृष्ट करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या आश्वासनांविरोधात केले.
3 कोटी आयुष्यमान कार्डांचे वितरण
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी 3 कोटी डिजिटल आयुष्यमान कार्डांच्या वितरणास प्रारंभ केला. ही देशव्यापी विमा योजना असून तिच्यात सहभागी होणाऱ्यांना 5 लाख रुपयांचे वैद्यकीय साहाय्य आवश्यकतेनुसार मिळू शकते. गरीबांमधील गरीबांनाही उत्तम आरोग्यसेवा मिळावी, हा या विमा योजनेचा हेतू आहे. ही आमची 5 लाख रुपयांची दीर्घकालीन लाभाची ‘गॅरँटी’ आहे. पायाभूत सुविधांमध्ये वेगाने सुधारणा करुन देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून अर्थव्यवस्था भक्कम झाल्याखेरीज कोणाचेही कल्याण करता येणार नाही, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावे, अशा अर्थाचे आवाहन त्यांनी केले.

सिकल सेल रोगाचे सर्वाधिक रुग्ण
सिकल सेल अॅनिमिया या घातक रोगाचे जगातील निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या भारतात आहेत. त्यामुळे भारताला या स्थितीच्या व्यवस्थापनासाठी विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय तज्ञांनीही अनेकदा दिला आहे. भारताच्या ग्रामीण आणि वनवासी क्षेत्रांमध्ये रोगाचा प्रसार वेगाने होत असून लहान मुलेही यातून सुटलेली नाहीत. केंद्र सरकार आणि राज्यसरकारांनी पुढाकार घेऊन नियंत्रणाचे कार्य हाती घ्यावे, अशी सूचना अनेक तज्ञांनी केली होती.
प्रचाराचे रणशिंग फुंकले
ड मध्यप्रदेशात विविध योजनांची घोषणा करुन निवडणुकीचे रणशिंग
ड पंतप्रधान मोदी यांचा मोफत गॅरँटेविरोधात सावध राहण्याचा इशारा
ड आयुष्यमान विमा योजनेच्या 3 कोटी कार्डांच्या वितरणास केला प्रारंभ
ड विविध रोग आणि त्यांच्या उद्रेकांविरोधात स्थायी यंत्रणा स्थापन होणार









