प्रलंबित कामे पूर्ण करण्याची पालकमंत्र्यांची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
विकासकामांबाबत निर्माण झालेल्या सावळ्या गोंधळामुळे स्मार्ट सिटीची आढावा बैठक चांगलीच गाजली. स्मार्ट सिटीमधील कामांसंदर्भातील आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्मार्ट सिटीच्या कार्यालयामध्ये बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती पाहून पालकमंत्री चांगलेच भडकले. व्हॅक्सिन डेपोमध्ये काम करताना केवळ हेरिटेजसाठी परवानगी घेतली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्मार्ट सिटीमधील अनधिकृत कामांचा लेखाजोखा चव्हाट्यावर आला आहे. पालकमंत्र्यांनी तुमच्यामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करा आणि उर्वरित कामे पूर्ण करा, अशी सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिली आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरामध्ये कामे सुरू आहेत. मात्र बहुसंख्य कामे अर्धवट आहेत. ही कामे करताना योग्यप्रकारे परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 930 कोटी रुपयाच्या निधीमध्ये 102 विकासकामे करण्यासाठी हाती घेण्यात आली. त्यामधील 96 कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
विश्वेश्वरय्यानगर येथे 51 कोटी खर्च करून इंटीग्रेटेड कमान अॅण्ड कंट्रोल सेंटर उभे करण्यात आले आहे. मात्र त्या सेंटरचा उपयोग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे इतका निधी खर्च करून उपयोग काय? असा प्रश्न पालकमंत्र्यांनी उपस्थित केला. यापुढे महापालिका, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांनी योग्यप्रकारे त्या सेंटरचा वापर करावा. याचबरोबर सध्या शिल्लक असलेला निधी योग्यप्रकारे खर्च करा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली आहे.
अंगणवाडी केंद्रासाठी 80 लाख रुपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. हा खर्च पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी इतका खर्च कोणकोणत्या कामासाठी केला आहे, त्याचा लेखाजोखा तयार करा आणि तो आम्हाला द्या, असे सांगितले. इतक्या प्रमाणात निधी खर्च केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याचबरोबर दक्षिण आणि उत्तर मतदारसंघामध्ये स्मार्ट सिटीचा सर्व निधी खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण मतदारसंघामध्ये एकही रुपये खर्च करण्यात आला नाही. यामागचे कारण काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ग्रामीण मतदारसंघामध्ये येणाऱ्या सर्व विभागांमध्ये स्मार्ट सिटीचा निधी खर्च करावा, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून 441 कोटी तर राज्य सरकारकडून 439 कोटी असे एकूण 880 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामधील केंद्राकडून 49 कोटी आणि राज्य सरकारकडून 61 कोटी रुपये मिळाले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. खासदार मंगला अंगडी यांनीही स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरामध्ये सायकल ट्रॅक करण्यात आले आहेत. मात्र ते कुचकामी ठरले आहेत. या सायकल ट्रॅकसाठी खर्च करण्यात आलेला निधी पूर्णपणे वाया गेला आहे, असे लोकप्रतिनिधींनी सांगितले. स्मार्ट सिटीमध्ये कामे झाली असली तरी अद्याप त्यामधून काहीच कर जमा झाला नाही, अशी माहिती स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सहीदा आफरीन बानु बळ्ळारी यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजनेमध्ये 19 कोटींचा निधी बचत करण्याबाबत चर्चा झाली. त्याबाबतचा संपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी कोणताही प्रस्ताव तयार केल्यानंतर तो सर्वांच्या निदर्शनास आणावा, असे सांगितले.
या बैठकीला आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.