नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन्स संघटनेचे निवेदन
बेळगाव : जिल्हा रुग्णालयात गर्भवती, बाळंतिणींच्या मृत्यूची प्रकरणे वाढीस लागली आहेत. याची सखोल चौकशी करावी तसेच जिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दूर करून रुग्णांना सोयीचे करून द्यावे, अशी मागणी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन्स बेळगाव या संघटनेने केली आहे. संघटनेच्या सदस्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. बेळगाव शहरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलीस वाहनधारकांवर नियमानुसार कारवाई करत नसल्याने रस्त्यावरून वाहने सुसाट जात असतात. त्यामुळे लहान-सहान अपघात घडत आहेत. वाहतूक पोलिसांना निर्देश द्यावेत. शहर परिसरात सायबर क्राईमचे प्रकार वाढीस लागले असून जनजागृती मोहीम हाती घ्यावी, जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून सरकारने रिक्त जागांवर नेमणुकीसाठी उपक्रम हाती घ्यावेत, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. जुलेखान मकानदार, शोभा होसमनी, हसीना नुलकर, शमशाद नुलकर, रेश्मा अनगोळकर, नौशिबा बागवान, सायबी बडेघर आदी निवेदन देताना उपस्थित होते.









