सर्वोच्च न्यायालयाकडूनही परीक्षेला ‘हिरवा कंदील’ : खासगी शिक्षण संस्थांची याचिका फेटाळली
प्रतिनिधी/ बेंगळूर
पाचवी आणि आठवीसाठी बोर्ड परीक्षा घेण्याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. तसेच कर्नाटक शिक्षण खात्याला परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला असून विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन संघटनांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सोमवार दि. 27 मार्चपासून सुरू झालेल्या पाचवी व आठवीच्या बोर्डाच्या परीक्षेतील अडसर दूर झाला आहे.
राज्य सरकारने विद्यार्थ्यांमधील अध्ययन पातळीचे मूल्यमापन करण्यासाठी 2022-23 या वर्षात पाचवी आणि आठवीसाठी बोर्डाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने बोर्डाची परीक्षा न घेण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात राज्य सरकारने 16 मार्च रोजी अपील केले होते. या याचिकेवर द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. या खंडपीठाने बोर्डाची परीक्षा घेण्यास सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत कोणतेही बंधन नाही, असा आदेश देत एकसदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली. तसेच 27 मार्चपासून परीक्षा घेण्याचे निर्देश सरकारला दिले होते.
त्यामुळे विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन संघटनांनी परीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 27 मार्च रोजी सुनावणी करणार असल्याचे सांगितले होते. सोमवारी सकाळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पर्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार देत सदर याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे पाचवी व आठवीची बोर्डाची परीक्षा दुपारपासून सुरू करण्यात आली.
पाचवीची 30 मार्चपर्यंत, आठवीची परीक्षा 1 एप्रिलपर्यंत होणार
पाचवीची परीक्षा 30 मार्चपर्यंत तर आठवीची परीक्षा 1 एप्रिलपर्यंत होणार आहे. 30 मार्च रोजी गणित विषयाचा पेपर सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत होईल. तर उर्वरित सर्व पेपर दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेत होणार आहेत.









