मोसादचा सर्वात प्रभावी हेर : शत्रू देशाच्या अध्यक्षांशी केली होती मैत्री
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलने सीरियातून स्वत:चा सर्वात धोकादायक अन् प्रसिद्ध हेर एली कोहेनशी निगडित हजारो वस्तू हस्तगत केल्या आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी सीरियाच्या आर्काइव्हमधून कोहेन यांच्याशी निगडित 2500 वस्तूंपैकी काही वस्तू कोहेन यांच्या पत्नीसमोर सादर केल्या. इस्रायलने गुप्त मोहिमेद्वारे सीरियातून एली कोहेन यांच्याशी संबंधित वस्तू आणण्यास यश मिळविले आहे.
एली कोहेन यांनी 60 च्या दशकात सीरियातून महत्त्वपूर्ण माहिती मिळवत इस्रायली सैन्याला मोठी मदत केली होती. सीरियात एली यांना अटक करण्यात आल्यावर फासावर लटकविण्यात आले होते. कोहेन यांना सीरियाची राजधानी दमास्कसच्या चौकात फासावर लटकविण्यात आल्याच्या घटनेला रविवारी 60 वर्षे पूर्ण झाली. नेतान्याहू यांनी यावेळी कोहेन यांना इस्रायलचे नायक संबोधून त्यांचे स्मरण केले.
इस्रायलने कोहेन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी सीरियातून आणण्यास यश मिळविले आहे. यात त्यांचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज, रिकॉर्डिंग, त्यांनी लिहिलेली पत्रं, सीरियामध्ये मिशनची छायाचित्रे आणि अटकेनंतर त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या वस्तू सामील आहेत. हाताने लिहिलेल्या नोट्सचे फोल्डर, कोहेन यांच्या दमास्कस येथील अपार्टमेंटची चावी, बनावट पासपोर्ट आणि ओळखपत्र इस्रायलने सीरियातून मिळविले आहे.
इस्रायलचे नायक आहेत एली
इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादला जगात ओळख मिळवून देण्यात कोहेन यांची सर्वात मोठी भूमिका असल्याचे मानले जाते. सीरियात कोहेन यांचे मिशन जागतिक स्तरावर मोसादची पहिली मोठी कामगिरी होती. इस्रायलला सीरिया विरोधात 1967 च्या युद्धात मिळालेल्या विजयाचे श्रेय कोहेन यांच्या हेरकौशल्याला देण्यात येते. या युद्धाने अरब जगतात इस्रायलचा दबदबा प्रस्थापित केला. एली कोहेन हे 1924 मध्ये इजिप्तच्या एलेग्जेड्रिया येथे एका सीरियन-ज्यू परिवारात जन्मले होते. त्यांचे पिता 1914 मध्ये सीरियाच्या एलेप्पो येथून इजिप्तमध्ये स्थलांतरित झाले होते. 1949 मध्ये कोहेन यांचा परिवार इस्रायलमध्ये स्थायिक झाला, परंतु कोहेन काही काळापर्यंत इजिप्तमध्ये स्वत:चे शिक्षण पूर्ण करत राहिले. कोहेन यांना इंग्रजी, अरबी, फ्रेंच भाषा अवगत होती, प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे इस्रायली गुप्तचर विभागाचे लक्ष त्यांच्यावर गेले.
सीरियात कसे पोहोचले?
कोहेन 1960 साली इस्रायलच्या गुप्तचर विभागात भरती झाली, हेर म्हणून प्रशिक्षणानंतर कोहेन अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनॉस आयर्स येथे पोहोचले आणि सीरियन वंशाचे व्यावसायिक म्हणून काम करू लागले. त्यांनी कामिल अमीन थाबेत हे नाव धारण करत लवकरच अर्जेंटीनातील सीरियन दूतावासाच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रभाव निर्माण केला. कोहेन 1962 साली सीरियाची राजधानी दमास्कस येथे पोहोचले. तेथे त्यांनी सत्तेच्या वर्तुळात प्रवेश केला. कोहेन लवकरच सीरियन सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती मिळवत इस्रायलपर्यंत पोहोचवू लागले.
सीरियात सत्तापालट
सीरियात 1963 साल महत्त्वपूर्ण ठरले, सीरियात सत्तापालटानंतर बाथ पार्टीला सत्ता मिळाली असता कोहेन यांचा प्रभाव अधिकच वाढला. या सत्तापालटाचे नेतृत्व अमीन अल-हफीज यांनी केले आणि ते अध्यक्ष झाले. सैन्य ब्रीफिंगवेळी देखील हफिज हे कोहेन यांना स्वत:सोबत ठेवून घ्यायचे. कोहेन हे गोलन हाइट्समधील सीरियन सैन्यतळांवरही गेले होते. कोहेन यांनी गोलान हाइट्सविषयी पाठविलेली माहिती युद्धात इस्रायलसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.
कसे पकडले गेले?
कोहेन यांना जगातील सर्वात प्रोफेशनल आणि धोकादायक हेरांपैकी एक मानले जाते, परंतु कोहेन हे रेडिओ ट्रान्समिशनमुळे पकडले गेले. जानेवारी 1965 मध्ये सीरियाच्या काउंटर-इंटेलिजेन्स अधिकाऱ्यांना पहिल्यांदा कोहेन यांच्या रेडिओ सिग्नलचा सुगावा लागला. यानंतर इस्रायलला ट्रान्सशिमन पाठवताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. कोहेन यांच्यावर दमास्कस येथे खटला चालवत त्यांना मृत्युदंड ठोठावण्यात आला. 1966 साली भर चौकात त्यांना फासावर लटकविण्यात आले होते.









