मूक मोर्चाचे आयोजन : जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला देणार बळ
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुंबई येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण केले जात आहे. या उपोषणाला सीमाभागाचे बळ देण्यासाठी रविवार दि. 31 रोजी बेळगाव शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वा. छत्रपती शिवाजी उद्यान येथून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या दरम्यान मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
वारंवार महाराष्ट्र सरकारला अल्टीमेट देऊनदेखील सरकारकडून आरक्षणासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याने अखेर मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून या उपोषणाला पाठिंबा मिळू लागला आहे. बेळगावमधील मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या उपोषणाला आता बेळगावमधूनही पाठिंबा दिला जात आहे.
शुक्रवारी जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत समाजबांधवांनी जाहीर पाठिंब्यासह मूकमोर्चा काढण्याचे निश्चित केले. या मूक मोर्चावेळी हातामध्ये भगवा झेंडा, फेटा, टोप्या घालून शेकडेंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले. गणेशोत्सव असला तरी काहीकाळ समाजासाठी काढून आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून एसपीएम रोड, रेल्वेओव्हरब्रिज, हेमू कलानी चौक, टिळक चौक, रामलिंगखिंड गल्ली मार्गे धर्मवीर संभाजी चौकात सांगता होणार आहे.
जरांगे-पाटील यांना पत्र
बेळगाव सकल मराठा व मराठी क्रांती मोर्चाच्यावतीने मनोज जरांगे-पाटील यांना पत्र पाठवून उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण मिळविण्यासाठी मुंबई येथे आंदोलन सुरू असून त्याला बेळगाव येथील मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. त्याचे पत्र जरांगे-पाटील यांना पाठविण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांची घेतली भेट
मराठा समाजाच्यावतीने रविवारी काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे व उपायुक्त नारायण बरमणी यांची भेट घेण्यात आली. मोर्चा शांततेत, तसेच नियोजनबद्ध काढला जाणार असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. यावेळी प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, आनंद आपटेकर, कपिल भोसले यांसह इतर उपस्थित होते.
मोर्चामध्ये येणाऱ्या नागरिकांना टोप्या, रेनकोट वाटप करणार
सकल मराठा समाजाच्या मोर्चामध्ये येणाऱ्या नागरिकांना एक हजार टोप्या व रेनकोट वाटप केले जाणार आहेत. राजकुमार शंकरराव मोरे मित्र परिवारातर्फे रविवारी होणाऱ्या मोर्चासाठी सहकार्य केले जाणार आहे. रमेश पावले यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रामुख्याने मोर्चामध्ये येणाऱ्या महिलांचे पावसापासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने रेनकोट वाटप केले जाणार आहेत. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी अंकुश केसरकर, आनंद आपटेकर, शिवराज सावंत, लक्ष्मण किल्लेकर यांसह इतर उपस्थित होते.









