वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये टॉप टीयर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकराव्या इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेला 14 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा 14 सप्टेंबर ते 30 एप्रिल 2025 पर्यंत खेळविली जाईल. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने मंगळवारी 2024-25 च्या फुटबॉल हंगामातील वरिष्ठ स्तरीय स्पर्धा कार्यक्रम जाहीर केला.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने घोषित केलेल्या 2024-25 च्या फुटबॉल हंगामातील स्पर्धा वेळापत्रकानुसार आता आशियातील सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धा 26 ते 31 जुलै दरम्यान होणार आहे. तसेच आय लिग फुटबॉल स्पर्धा 19 ऑक्टोबर ते 30 एप्रिल दरम्यान खेळविली जाईल. सुपर चषक फुटबॉल स्पर्धा 1 ऑक्टोबर ते 15 मे दरम्यान होणार आहे.
आय लिग-2 साठी पात्र फेरीची आय लिग 3 स्पर्धा 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान होईल. आय लिग 2 स्पर्धा 15 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे. संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा 5 ते 15 नोव्हेंबर दरम्यान (ग्रुप स्टेज) तसेच 1 ते 15 डिसेंबर दरम्यान अंतिम फेरी खेळवली जाईल. महिलांची फुटबॉल लिग स्पर्धा 25 ऑक्टोबर ते 30 एप्रिल तसेच महिलांची लिग-2 स्पर्धा 25 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान होईल. 29 वी वरिष्ठ महिलांची राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा सप्टेंबर महिन्यात (ग्रुप स्टेज) तसेच ऑक्टोबर महिन्यात अंतिम फेरी होणार आहे. देशातील सर्व वरिष्ठ लिग स्पर्धा पुढील वर्षीच्या एप्रिल महिनाअखेर संपुष्टात येतील. येत्या जुलै महिन्यात राष्ट्रीय राज्यस्तरीय स्पर्धेला प्रारंभ केला जाणार आहे. कनिष्ठ मुले आणि मुलींची फुटबॉल स्पर्धा जुलै महिन्यात टीयर वन आणि टीयर टू घेतली जाईल. येत्या ऑगस्ट महिन्यात उपकनिष्ठ मुले आणि मुलींची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा टीयर वन आणि टीयर टू होणार आहे. राष्ट्रीय बिच फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तर पुरूषांची फुटसाल क्लब चॅम्पियनशिप स्पर्धा 2025 च्या मेमध्ये घेतली जाईल. 13, 15, 17 वर्षाखालील युवांसाठी लिग फुटबॉल स्पर्धा सप्टेंबर ते मे अशा 9 महिन्यांच्या कालावधीत घेतली जाईल.









