वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेनमधील ला नुसिया येथे सुरू असलेल्या डब्ल्यूबीसी विश्व युवा पुरुष आणि महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या आणखी चार स्पर्धकांनी आपल्या विविध वजनगटात उपांत्यफेरीत प्रवेश मिळवून आणखी चार पदके निश्चित केली आहेत. या स्पर्धेत भारताने अकरा पदकांवर शिक्कामोर्तब केला आहे.
महिला विभागात 81 किलोवरील वजनगटात भारताच्या युवा आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेतील रौप्यपदक विजेती कीर्ती तसेच 52 किलो गटात देविका घोरपडे यांनी उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. पोलंडमध्ये यापूर्वी झालेल्या युवा विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताने अकरा पदकांची कमाई केली होती. महिलांच्या 50 किलो वजनगटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या तमन्नाने जपानच्या ज्युनी टोनगावाचा एकतर्फी पराभव करत उपांत्यफेरी गाठली. 52 किलो वजनगटात देविका घोरपडेने जर्मनीच्या एसिया ऍरीचा 5-0 अशा गुणांनी पराभव केला. 75 किलो वजनगटात मुस्कानने तर 81 किलोवरील वजनगटात किर्तीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अनुक्रमे मंगोलियाच्या अझिमबेई आणि रुमानियाच्या बोटिका यांचा पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. या दोन्ही भारतीय स्पर्धकांनी केवळ तीन मिनिटातच आपले विजय नोंदविले. दरम्यान, 57 किलो गटात प्रिती दाहिया, 92 किलोवरील गटात रिदम आणि 51 किलो गटात एम. जादुमणी सिंग यांना मात्र प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या मुस्कान, तमन्ना, देविका, कीर्ती, टी. कुंजाराणी देवी, भावना शर्मा, रविना तसेच लाशू यादव यांनी आपल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती जिंकून पुढील फेरीत स्थान मिळविले आहे. पुरुष विभागात 63.5 किलो वजनगटात वंशज, 48 किलो गटात विश्वनाथ सुरेश, 54 किलो गटात आशिष यांनी उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेतील अंतिम लढती शुक्रवार आणि शनिवारी होतील.









